IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना चेन्नईच्या मैदानात खेळवला जात असून ऑस्ट्रेलियाचा संघ 269 धावांवर सर्वबाद झाला आहे. आता सामना जिंकण्यासाठी भारताला 50 षटकांत 270 धावा करायच्या आहेत. सामन्यात टॉस जिंकत ऑस्ट्रेलियानं फलंदाजी निवडली ज्यानंतर मिचेल मार्शनं सर्वाधिक 47 धावा केल्या असून इतर खेळाडूंनीही काहीप्रमाणात चांगली खेळी केल्याने 269 पर्यंत कांगारुंची धावसंख्या गेली आहे. भारताकडून हार्दिक, कुलदीपनं प्रत्येकी 3 तर सिराज आणि अक्षरनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या करण्याचा त्यांचा मानस होता. दरम्यान फलंदाजीला आलेल्या सलामीवी मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 68 धावांची शानदार भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण नंतर हार्दिक पांड्याने हेडच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले, ज्याला त्याने 33 च्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर यानंतर बॅटिंगला आलेला कांगारूंचा कर्णधार स्टीव्ह स्मिथही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. 47 धावांची शानदार खेळी केल्यानंतर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या मिचेल मार्शच्या रूपाने 85 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या संघाला तिसरा मोठा धक्का बसला. इथून डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांच्यात चौथ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. वॉर्नर आणि लबुशेन यांना पाठोपठ पॅव्हेलियनमध्ये पाठवून कुलदीप यादवने 138 धावांवर ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत घालवला.
खालच्या फळीतील फलंदाजांची झुंज
निम्मा संघ अवघ्या 138 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, ऑस्ट्रेलियन डाव मार्कस स्टॉइनिस आणि अॅलेक्स कॅरी यांनी सावरला. त्यांनी 6व्या विकेटसाठी 54 चेंडूत 58 धावांची भागीदारी करत धावसंख्या 200 च्या जवळ नेली. स्टॉइनिस 25 आणि कॅरी 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर सीन अॅबॉट आणि अॅश्टन अगर यांनी 8व्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करत धावसंख्या 250 पर्यंत नेली. शॉन अॅबॉटने 26, तर अॅश्टन अगरने 17 धावांची खेळी केली, तर मिचेल स्टार्क आणि अॅडम झाम्पा यांनी शेवटच्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 269 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताकडून हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी गोलंदाजीत 3-3 तर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने 2-2 बळी घेतले.
हे देखील वाचा-