Ind vs Aus : टीम इंडिया पराभवाच्या छायेत! दुसऱ्या दिवशी अर्धा संघ तंबूत, ऑस्ट्रेलियाकडे 29 धावांची आघाडी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मालिकेतील दुसरा कसोटी सामना ॲडलेड ओव्हलच्या मैदानावर पिंक बॉलने खेळला जात आहे.
Australia vs India 2nd Test : चार वर्षांपूर्वी डिसेंबर महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये डे-नाईट कसोटी सामना खेळला गेला होता. ही तीच कसोटी होती ज्यात भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या 36 धावांत ऑलआऊट झाला आणि ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. आता डिसेंबर 2024 मध्येही ॲडलेड ओव्हल मैदानावर पिंक बॉलसमोर भारतीय फलंदाजीची स्थिती बदललेली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा पराभवाच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे, जिथे त्यांच्या फक्त 5 विकेट्स शिल्लक आहेत आणि ते ऑस्ट्रेलियाच्या 29 धावांनी मागे आहेत.
ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसरा दिवसही यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. पर्थ कसोटीतील पराभवानंतर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली या संघाने शनिवारी विजयाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले. ॲडलेड कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 4 गडी गमावून 128 धावा केल्या होत्या. टीम इंडिया पहिल्या डावात अजूनही 29 धावांनी मागे आहे. भारताच्या दुसऱ्या डावात सध्या ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत पॅट कमिन्स आणि स्कोर बोलँडने प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत, तर मिचेल स्टार्कनेही एक विकेट घेतली आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या. भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली झाली कारण नॅथन मॅकस्विनी आणि स्टीव्ह स्मिथ लवकरच बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. मार्नस लॅबुशेनने 64 धावांचे अर्धशतक झळकावले, पण ट्रेव्हिस हेड चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. 99 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळताना हेडने 140 धावा केल्या, जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक होते.
That's Stumps on Day 2#TeamIndia trail by 29 runs with Rishabh Pant and Nitish Kumar Reddy in the middle
— BCCI (@BCCI) December 7, 2024
Updates ▶️ https://t.co/upjirQCmiV#AUSvIND pic.twitter.com/ydzKw0TvkN
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतावर 157 धावांची आघाडी घेतली होती. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. राहुल अवघ्या 7 धावा करून बाद झाला आणि त्याच्याशिवाय विराट कोहली केवळ 11 धावाच करू शकला. जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी अनुक्रमे 24 आणि 28 धावा केल्या. कॅप्टन रोहित शर्मा क्रीजवर आल्यापासून संघर्ष करताना दिसला, त्याला पॅट कमिन्सने 6 धावांवर क्लीन बोल्ड केले. आता भारत पराभवापासून फक्त 5 विकेट दूर आहे.
ऋषभ पंतकडून आशा
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऋषभ पंत वेळोवेळी टीम इंडियाचा तारणहार ठरत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऋषभ पंतने 28 धावा केल्या असून तो सध्या 112 च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. त्याच्यासोबत नितीश कुमार रेड्डी यानेही 14 चेंडूत 15 धावा केल्या आहेत. दोघांनी वेगवान फटके मारण्याचा प्रयत्न केला. डावाचा पराभव टाळण्यासाठी टीम इंडियाला किमान 29 धावा कराव्या लागतील.