IND vs AFG Test Empty Stadium : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मुल्लानपूर, न्यु चंदीगड येथे सुरू आहे. मात्र, हा सामना क्रिकेटपेक्षा स्टेडियममधील रिकाम्या खुर्च्यांमुळेच जास्त चर्चेत आला आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या ढासळत्या लोकप्रियतेचे एक चिंताजनक चित्र या निमित्ताने समोर आले असून, सोशल मीडियावर क्रीडाप्रेमींनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) जोरदार टीका केली आहे. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंतर चाहत्यांनी कसोटी क्रिकेटकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसते आहे.

फक्त 50 रुपये तिकीट, तरीही प्रेक्षक गायब! (IND vs AFG Test match empty stadium)

या 5 दिवसीय कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने अवघे 250 रुपये (म्हणजेच फक्त 50 रुपये प्रतिदिवस) इतके स्वस्त तिकीट ठेवले होते. तरीही, सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टेडियममध्ये अवघे 500 प्रेक्षकही उपस्थित नव्हते. संपूर्ण स्टँड ओस पडले होते. पंजाबमधील सध्याचे प्रचंड तापमान आणि कडक ऊन हे याचे एक मुख्य कारण मानले जात असले, तरी नवीन स्टेडियमवर पायाभूत सुविधांची असलेली कमतरताही चाहत्यांच्या नाराजीला कारणीभूत ठरली आहे.

'विराट कोहली' पर्वाची आठवण

काही काळापूर्वी बीसीसीआयने सुपरस्टार संस्कृती संपवण्यासाठी विराट कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूंना देशांतर्गत रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता हा विराट कोहलीचाच फ्लेक्स ठरल्याचे दिसते. एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले की, "मी विराटचा समर्थक नाही, पण सत्य हेच आहे की कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने भारतात आणि जागतिक स्तरावर कसोटी क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेले होते. स्टेडियममध्ये जी ऊर्जा असायची, ती आता गायब झाली आहे." कोहली खेळत नसताना 500 लोकही सामना पाहायला येत नसल्याने, कसोटी क्रिकेटमधील त्याची ब्रँड व्हॅल्यू पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

चुकलेले नियोजन... मुंबईचे उदाहरण

क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहत्यांनी बीसीसीआयच्या या नियोजनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका नवीन आणि अपरिचित मैदानावर अशा सामन्याचे आयोजन करण्याच्या हेतूवरच शंका घेतली जात आहे. "जर हाच सामना मुंबई किंवा इतर पारंपारिक क्रिकेट केंद्रांवर झाला असता, तर किमान 90% स्टेडियम प्रेक्षकांनी भरले असते," असा सूर उमटत आहे. अफगाणिस्तानसारख्या संघाविरुद्धच्या सामन्यांना गर्दी खेचण्यासाठी बीसीसीआयने शाळकरी मुले आणि स्थानिक चाहत्यांना मोफत तिकिटे द्यायला हवी होती, अशीही मागणी होत आहे. 

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटचा ढासळणारा टीआरपी आणि मैदानातील हा सन्नाटा बीसीसीआयसाठी धोक्याची घंटा आहे. जर क्रिकेट बोर्डाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर कसोटी क्रिकेटचे दिवस पुन्हा सुवर्णकाळात कसे परतणार? हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा -

Team India T20 Squad : कमी विकेट घेणाऱ्यांना संधी, पण IPL मध्ये 28 विकेट्स घेऊनही 'तो' गायब; निवड समितीने केला सर्वात मोठा गेम, जो कोणालाच समजला नाही