Ind vs Afg T20 Series Schedule: अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्याची (Ind vs Afg T20 Series) घोषणा केली आहे. ही संपूर्ण मालिका नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार असून अफगाणिस्तान यजमानाची भूमिका बजावणार आहे. मालिकेतील तीनही सामने रविवार, 13 सप्टेंबर, मंगळवार, 15 सप्टेंबर आणि गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. एसीबीच्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या तारखा आणि ठिकाणाला सहमती दर्शवली आहे.
अफगाणिस्तानचा संघ भारतात येणार- (Ind vs Afg T20 Series)
अफगाणिस्तान पहिल्यांदाच भारतीय भूमीवर भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी अफगाणिस्तानने भारताला आपले होम ग्राउंड बनवून लखनऊ, देहरादून आणि ग्रेटर नोएडा येथे इतर देशांविरुद्ध सामने आयोजित केले आहेत. मात्र, भारतालाच आपला प्रतिस्पर्धी मानून भारतातील होम ग्राउंडवर मालिका खेळण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ असेल.
एसीबीकडून मालिकेची घोषणा- (Ind vs Afg T20 Series)
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नसीब खान यांनी बोर्डाच्या व्यावसायिक भागीदारांना पाठवलेल्या अधिकृत पत्रातून या दौऱ्याची पुष्टी केली आहे. या पत्रात त्यांनी 13 ते 17 सप्टेंबरदरम्यान भारताविरुद्ध ही मालिका खेळवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही क्रिकेट बोर्डांकडून अद्याप याबाबत सार्वजनिक स्वरूपात औपचारिक घोषणा होणे बाकी असले तरी एसीबीने मालिकेच्या तारखा आणि ठिकाण निश्चित केले आहे.
बांगलादेश दौऱ्याची शक्यता जवळपास संपली- (India vs Bangladesh)
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेची पुष्टी झाल्यानंतर भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्याची शक्यता जवळपास संपली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) 1 ते 13 सप्टेंबरदरम्यान भारताविरुद्ध सहा पांढऱ्या चेंडूचे सामने (वनडे आणि टी-20) खेळवण्याची योजना आखली होती. मात्र, आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेच्या तारखा बांगलादेशच्या प्रस्तावित वेळापत्रकाशी जुळत आहेत. त्यामुळे भारताचा बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक- (Ind vs Afg T20 Series Schedule)
- पहिला टी20 सामना: 13 सप्टेंबर, 2026, नवी दिल्ली
- दुसरा टी20 सामना: 15 सप्टेंबर, 2026, नवी दिल्ली
- तिसरा टी20 सामना: 17 सप्टेंबर, 2026, नवी दिल्ली
