Ind vs Afg Test Day-1 Update : पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचाच बोलबाला; गिल अन् राहुलने ठोकले शतक, तर सुदर्शन-पंतची वादळी फटकेबाजी
India vs Afghanistan One-off Test Live Day-1 Update : आज, 6 जूनपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. हा सामना 10 जूनपर्यंत खेळला जाणार आहे.
LIVE

Background
India vs Afghanistan One-off Test Match Live Cricket Score Update In Marathi : आयपीएल 2026 संपल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळले आहे. जगभरात अनेक महत्त्वाचे सामने खेळले जाणार असले तरी आज सुरू होणाऱ्या एका विशेष सामन्याकडे सर्वांची नजर लागली आहे. या सामन्यात दोन्ही संघांकडे अनेक स्टार खेळाडू असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आज, 6 जूनपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. हा सामना 10 जूनपर्यंत खेळला जाणार आहे. त्यानंतर 13 जूनपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेलाही सुरुवात होईल.
IND vs AFG कसोटी सामना कधी आणि कुठे खेळला जाणार?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा एकमेव कसोटी सामना महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लांपूर (न्यू चंदीगड) येथे खेळवला जाणार आहे. सामना सकाळी 9:30 वाजता सुरू होईल, तर त्याआधी अर्धा तास म्हणजे 9:00 वाजता नाणेफेक होणार आहे.
या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार असून, अफगाणिस्तान संघाची धुरा हशमतुल्लाह शाहिदी यांच्या खांद्यावर असेल. दोन्ही संघांमधील हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा असून क्रिकेट चाहत्यांना दर्जेदार कसोटी क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे.
IND vs AFG: पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचाच बोलबाला; गिल अन् राहुलने ठोकले शतक! तर सुदर्शन-पंतची फटकेबाजी
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकमेव ऐतिहासिक कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात 368 धावांचा डोंगर उभा केला असून सामना पूर्णपणे आपल्या खिशात टाकला आहे. कर्णधार शुभमन गिल आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत सध्या क्रीजवर नाबाद आहेत.
सुरुवातीलाच झटका, पण नंतर धावांचा पाऊस!
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल अवघ्या 24 धावा करून सलीम सफीच्या गोलंदाजीवर बाद झाला. 41 धावांवर भारताला पहिला धक्का बसला.
मात्र, यानंतर आलेल्या साई सुदर्शनने के.एल. राहुलसोबत मिळून अफगाण गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सुदर्शनने संयमी फलंदाजी करत 130 चेंडूत 81 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 11 चौकार मारले. दुसऱ्या विकेट्साठी या दोघांमध्ये 139 धावांची शानदार भागीदारी झाली. सुदर्शन शतकाच्या जवळ असताना पुन्हा एकदा सलीम सफीने त्याला बाद करत अफगाणिस्तानला दुसरे यश मिळवून दिले.
के.एल. राहुल अन् शुभमन गिलची शतकी खेळी
एक बाजू लावून धरलेल्या के.एल. राहुलने आपले उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत शानदार शतक ठोकले. राहुलने 165 चेंडूंचा सामना करत 10 चौकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या. त्याला झियाउर रहमान शरीफीने बाद केले. राहुल बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 60.2 षटकात 247 धावा होती.
त्यानंतर शुभमन गिलने कर्णधाराला साजेशी खेळी करत अवघ्या 143 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 103 धावा केल्या. गिलने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना पार थकवून सोडले.
ऋषभ पंतचे अर्धशतक
राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने गिलला उत्तम साथ दिली. पंतने आपल्या नेहमीच्याच आक्रमक शैलीत फलंदाजी करत 70 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 50 धावा ठोकल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गिल (103*) आणि पंत (50*) यांच्यात 121 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे.
Ind vs Afg Test Day-1 Live Update : कर्णधार गिलचे अर्धशतक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
शुभमन गिलने 68 चेंडूंमध्ये आपले नववे अर्धशतक पूर्ण केले.
तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. कर्णधार म्हणून 1,000 कसोटी धावा पूर्ण करणारा तो 11वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
त्याने आपल्या 15व्या डावात हा पराक्रम केला, जो सुनील गावसकर (14 डाव) यांच्यानंतर भारतासाठी दुसरा सर्वात जलद आहे.
तसेच, भारतीय कर्णधाराने हा टप्पा गाठण्यासाठी घेतलेला हा सर्वात कमी कालावधी (351 दिवस) आहे.



















