India vs Afghanistan 1st ODI : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 13 जून रोजी धर्मशालातील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मात्र मालिकेपूर्वीच टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे कर्णधार शुभमन गिलसमोर मजबूत प्लेइंग इलेव्हन निवडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
तरीही भारतीय संघाकडे अनुभवी आणि युवा खेळाडूंचा मेळ असल्याने विराट आणि हार्दिकच्या अनुपस्थितीतही संघ मजबूत दिसत आहे. धर्मशालाच्या खेळपट्टीवर रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी पुन्हा एकदा डावाची सुरुवात करताना दिसू शकते. रोहित आपल्या अनुभवाच्या जोरावर संघाला दमदार सुरुवात करून देण्याचा प्रयत्न करेल, तर कर्णधार शुभमन गिल फलंदाजीसह नेतृत्वाची जबाबदारीही प्रभावीपणे पार पाडण्याच्या तयारीत असेल. गेल्या काही वर्षांत वनडेमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे शुभमन संघाचा कणा बनला आहे.
ईशान किशनला मोठी संधी
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार हा मोठा प्रश्न आहे. या स्थानासाठी ईशान किशन सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. याआधीही त्याने या क्रमांकावर प्रभावी फलंदाजी केली आहे. उपकर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. तर विकेटकीपर फलंदाज केएल राहुल पाचव्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे. राहुलवर केवळ धावा करण्याचीच नव्हे, तर डाव सावरण्याचीही जबाबदारी असेल.
नीतीश कुमार रेड्डीला सुवर्णसंधी
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीचा सर्वाधिक फायदा नीतीश कुमार रेड्डीला होऊ शकतो. आयपीएलमधील अष्टपैलू कामगिरीमुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यात आहे. धर्मशालामध्ये त्याला स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळू शकते.
प्रिन्स यादव करणार वनडे पदार्पण?
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज संघात नसल्याने अर्शदीप सिंग भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल. त्याला प्रसिद्ध कृष्णाची साथ मिळू शकते. मात्र सर्वांचे लक्ष युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवकडे लागले आहे. आयपीएलमधील शानदार प्रदर्शनानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले असून धर्मशालामध्ये तो वनडे पदार्पण करू शकतो. तसे झाल्यास तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण ठरेल.
फिरकीची जबाबदारी कुलदीप-सुंदरवर
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाज अनेकदा निर्णायक भूमिका बजावतात. त्यामुळे कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे भारताचे तुरुपाचे पान ठरू शकतात. कुलदीपने वनडेमध्ये 194 बळी घेतले असून अफगाण फलंदाजांना अडचणीत टाकण्याची क्षमता त्याच्यात आहे. तर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत योगदान देत संघाला आवश्यक संतुलन देऊ शकतो.
भारताची संभाव्य प्लेइंग-11
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), ईशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव.
हे ही वाचा -
