India vs England 5th Test : धर्मशाला कसोटी सामन्यात इंग्लंडची फलंदाजी सपशेल फेल ठरली आहे. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाजांनी विकेट फेकल्या. प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या इंग्लंडचे आठ फलंदाज 200 धावांच्या आत तंबूत परतले. कुलदीप यादव याच्या फिरकीसमोर इंग्लंडची पळती भुई थोडी झाली. कुलदीपनं पहिल्यांदा बेन डकेट याला 27 धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर ओली पोपही तंबूत परतला. ओली पोप याला फक्त 11 धावांचं योगदान देता आलं. ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव यांनी प्लॅन करुन ओली पोप याला बाद केले. कुलदीपच्या चेंडूवर ओली पोप यष्टीचीत झाला.


कुलदीप यादवच्या चेंडूवर पुढे येऊ फटकावण्याच्या प्रयत्नात ओली पोप बाद झाला. ओली पोप याला बाद करण्यात ध्रुव जुरेल याची महत्वाची भूमिका होती. ध्रुव जुरेल यानं कुलदीपला एक चेंडू टाकण्यापूर्वीच ओली पोप पुढे येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार कुलदीप यादवनं चेंडू फेकला. त्यानंतर उर्वरित काम ध्रुव जुरेल यानं केले. ध्रुव जुरेल याच्या चपळतेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 






राजस्थान रॉयल संघाने सोशल मीडियावर ध्रुव जुरेल याच्यासाठी खास पोस्ट केली आहे. ओली पोप याला बाद केल्यानंतरची ही पोस्ट आहे. त्यामध्ये ध्रुव जुरेल याचं कौतुक करण्यात आलेय. हा पुढे जाईल.. असं कुलदीपला ध्रुव जुरेल यानं आधीच सांगितलं होतं. त्यानंतर कुलदीपने चेंडू फेकला अन् ओली पोप बाद झालाय.






फिरकीच्या जाळ्यात साहेब अडकले - 


भारताच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचा संघ अडकलाय. चांगल्या सुरुवातीनंतर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. इंग्लंडचे आठ फलंदाज 194 धावांत तंबूत परतले आहेत. भारताकडून कुलदीप यादवने पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. तर आर. अश्विन यानं दोन विकेट घेतल्या तर जाडेजानं एका फलंदाजाला तंबूत पाठवलं. इंग्लंडकडून जॅक क्रॉली यानं संघर्ष केला. त्यानं 108 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 79 धावांची खेळी केली. त्याशिवाय बेन डकेट 27, ओली पॉप 11, जो रुट 26, जॉनी बेअरस्टो 29 , बेन स्टोक्स आणि टॉप हार्ट्ले यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.






कुलदीप यादवने 15 षटकात 72 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. तर रवींद्र जाडेजानं सात षटकात 14 धावा खर्च करत एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांनीही भेदक मारा केला. त्यांना विकेट मिळवण्यात अद्याप अपयश आलेय.