ICC World Cup 2023, IND vs AUS : गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रविवारी (19 नोव्हेंबर 2023) टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील अंतिम सामना खेळला गेला. आतापर्यंतचे सर्व विश्वचषक (World Cup 2023) विजेते कर्णधार वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यात सहभागी झाले होते. पण, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वर्ल्डकपवर सर्वात पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघाचं नाव कोरणारे कपिल देव (Kapil Dev) मात्र अंतिम सामन्यासाठी उपस्थित नव्हते. यावरुन काँग्रेसनं (Congress) बीसीसीआयवर (BCCI) टीकास्त्र डागलं आहे. तसेच, स्वतः कपिल देव यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 


काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट केलं की, कपिल देव यांना बीसीसीआयनं अहमदाबाद येथे होणाऱ्या विश्वचषक फायनलसाठी आमंत्रित केलं नव्हतं, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ते म्हणाले की, बेदींप्रमाणेच कपिल देव हे देखील त्यांची दिलखुलास मतं परखडपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. तसेच, काही महिन्यांपूर्वी त्यांनी आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचं समर्थन केलं होतं. 






बीसीसीआयनं जारी केलेल्या प्लॅननुसार, आजच्या सामन्यादरम्यान विश्वविजेत्या संघाच्या कर्णधारांना सन्मानित करण्यात येणार होतं. ज्यासाठी कपिल देव यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं.


कधी-कधी लोक विसरुन जातात : कपिल देव 


घडल्या प्रकाराबाबत स्वतः कपिल देव यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव म्हणाले की, मला माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत हा प्रवास करायचा होता. पण मला त्या सोहळ्यासाठी आमंत्रणच दिलं नव्हतं. त्यांनी मला बोलावलं नाही, त्यामुळे मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की, अंतिम सामना पाहताना माझ्यासोबत 1983 ची संपूर्ण टीम असावी, परंतु मला असं वाटतंय की, खूप मोठं आयोजन होतं आणि कधीकधी लोक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी विसरुन जातात.


टीम इंडियाचा पराभव, कांगारूंची सरशी 


आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये स्फोटक सुरुवात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावला नाही. टीम इंडियानं स्पर्धेतील सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरीत थाटात प्रवेश केलेला. अशा परिस्थितीत टीम इंडियाच विजेतेपद पटकावून इतिहास रचेल, असं दिग्गजांसह चाहत्यांनाही वाटत होतं. पण, 140 कोटी भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सामना 5 वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात टीम इंडिया विजयी पताका फडकवणार असा विश्वास प्रत्येक भारतीयाला होताच, पण कांगारूंनी  विजयरथावर स्वार झालेल्या टीम इंडियाला रोखलं आणि विश्वचषकावर नाव कोरलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India vs Australia World Cup Final Analysis: विजयरथावर स्वार झालेली टीम इंडिया, फायनलमध्ये मात्र सपशेल फ्लॉप, कशी? 'ही' 5 सर्वात मोठी कारणं!