Iran-Israel War : युद्धाची धास्ती आता क्रिकेटच्या खेळपट्टीवर... इराण-इस्रायल तणावात वर्ल्ड कप लीग 2 चे सामने रद्द; ICCचा मोठा निर्णय
ICC World Cup League 2 Update : मिडल ईस्टमधील वाढत्या लष्करी तणावाचा परिणाम आता क्रिकेटवरही दिसू लागला आहे.

ICC World Cup League 2 Update : मिडल ईस्टमधील वाढत्या लष्करी तणावाचा परिणाम आता क्रिकेटवरही दिसू लागला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे आणि त्या परिसरातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदला (ICC) मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग-2 मधील सहा सामने सध्या स्थगित करण्यात आले आहेत.
हे सर्व सामने 10 मार्चपासून नेपाळमध्ये खेळवले जाणार होते. मात्र, प्रवास आणि सुरक्षेसंदर्भातील चिंतेमुळे हे सामने पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. आता या सामन्यांसाठी नवीन तारखांची घोषणा नंतर केली जाणार आहे.
नेपाळमध्ये होणार होते सामने
नियोजित वेळापत्रकानुसार हे सामने काठमांडू येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळवले जाणार होते. 10 ते 20 मार्चदरम्यान येथे एकूण सहा वनडे सामने आयोजित करण्यात आले होते. या त्रिकोणी मालिकेत नेपाळ, ओमान आणि यूएई या संघांमध्ये सामने होणार होते.
मात्र, मिडल ईस्टमधील वाढत्या संघर्षामुळे हवाई प्रवासावर परिणाम झाला आहे. अनेक विमानमार्ग बंद झाले असून सुरक्षा चिंताही वाढल्या आहेत. त्यामुळे संघांना नेपाळमध्ये पोहोचणे कठीण झाले. या पार्श्वभूमीवर हे सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
नेपाळ क्रिकेट संघटनेची माहिती
या निर्णयाची माहिती नेपाळ क्रिकेट असोसिएशनने 4 मार्च रोजी सोशल मीडियावरून दिली. मिडल ईस्टमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेता काठमांडूमध्ये होणारे लीग-2 सामने पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. ओमान, यूएई आणि नेपाळ यांच्यातील सर्व सामने यामुळे प्रभावित झाले आहेत. आयसीसी आणि संबंधित क्रिकेट बोर्ड परस्पर चर्चेनंतर लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करतील, असेही सांगण्यात आले.
2027 वर्ल्ड कप पात्रता प्रक्रियेचा भाग
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2027 साठीच्या पात्रता प्रक्रियेत क्रिकेट वर्ल्ड कप लीग-2 या स्पर्धेची महत्त्वाची भूमिका आहे. ही स्पर्धा तीन वर्षे चालते आणि त्यात एकूण आठ संघ सहभागी होतात. स्पर्धेच्या अखेरीस गुणतालिकेतील अव्वल चार संघ क्वालिफायर फेरीत पोहोचतात. तेथूनच वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचे अंतिम स्थान निश्चित होते. उर्वरित संघांना पुढील संधी मिळवण्यासाठी अतिरिक्त सामने खेळावे लागतात. त्यामुळे या स्पर्धेतील प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
पुढील फेरी नामिबियामध्ये
नेपाळमध्ये होणारे सामने सध्या स्थगित असले तरी लीग-2 चे पुढील सामने एप्रिलमध्ये खेळवले जाणार आहेत. पुढील फेरी स्कॉटलंड, ओमान आणि नामिबिया यांच्यात नामिबियाची राजधानी विंडहोक येथे 2 एप्रिलपासून सुरू होणार आहे. सध्या गुणतालिकेत अमेरिकेचा संघ अव्वल स्थानावर असून पात्रता शर्यतीत मजबूत स्थितीत आहे. आता मिडल ईस्टमधील परिस्थिती कधी सुधारते आणि स्थगित केलेल्या सामन्यांसाठी नवीन तारखा कधी जाहीर होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा -




















