T20 WC 2021: दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ICC T20 विश्वचषक (ICC T20 WC) सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला. इंग्लंडकडून जोस बटलरने अर्धशतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 126 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली होती. संघाकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर ख्रिस वोक्सने 2 बळी घेतले. याशिवाय आदिल रशीद, लियाम लिव्हिंगस्टोन आणि टायमल मिल्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.


ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची निराश कामगिरी
प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. सुरुवातीच्या षटकातच संघाने आपले 4 महत्त्वाचे विकेट गमावले. पॉवरप्लेमध्ये संघाला केवळ 21 धावा करता आल्या. डेव्हिड वॉर्नर (1), स्टीव्ह स्मिथ (1), ग्लेन मॅक्सवेल (6) आणि मार्कस स्टॉइनिस (0) धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅथ्यू वेडने कर्णधार अॅरॉन फिंचसह संघाची धावसंख्या पुढे नेली आणि 10 षटकांत 4 गडी गमावून 41 धावा केल्या.


वेडने 18 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. त्याला लिव्हिंगस्टोनने बाद केले. एकीकडे कर्णधार फिंच मैदानावर एक बाजू लावून होता तर दुसरीकडे झटपट विकेट पडत राहिल्या. अॅश्टन अगारने फिंचसह 35 चेंडूत 47 धावा केल्या. यानंतर अगार 2 षटकारांच्या मदतीने 20 धावा करून बाद झाला. दरम्यान, कर्णधार फिंचने 49 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 44 धावा करून जॉर्डनच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर पॅट कमिन्स (12), अॅडम झम्पा (1) आणि मिचेल स्टार्क (13) यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 125 धावा करता आल्या.