ICC ODI Rankings Shubman Gill replaces Babar Azam : आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला दिवस आहे. ज्यामध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ आमनेसामने आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमला मोठा धक्का बसला आहे. यावेळी त्याला आयसीसी रँकिंगमध्ये नुकसान झाले आहे. दरम्यान, भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज आणि प्रिन्स शुभमन गिलने अव्वल स्थान पटकावले आहे.
वा रे पठ्ठ्या... लई भारी...! 'प्रिन्स' शुबमन गिलचा ICC रँकिंगमध्ये डंका
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर गेला आहे. त्याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला मागे टाकले आहे. शुभमन गिल 796 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला, तर बाबर आझम 773 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला. बाबर आझम न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेत अपयशी ठरला होता, ज्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. दुसरीकडे, शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये त्याने 2 अर्धशतके आणि एक शतक झळकावले होते. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानांमध्ये फारसा फरक नाही, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान आणखी काही अपसेट दिसू शकतात.
शुभमन गिलने 2019 मध्ये पदार्पण केले होते आणि या खेळाडूने आतापर्यंत फक्त 50 एकदिवसीय सामने खेळले आहेत, इतक्या कमी सामन्यांमध्ये हा खेळाडू नंबर 1 स्थानावर पोहोचला आहे. गिलने 60 पेक्षा जास्त सरासरीने 2587 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये गिलने 7 शतके आणि 15 अर्धशतके झळकावली आहेत. गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्येही द्विशतक झळकावले आहे. गिल हा एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान 2500 धावा करणारा खेळाडू देखील आहे. यामुळेच गिल हा नंबर 1 वनडे फलंदाज बनला.
रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर कायम!
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अजूनही तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे सध्याचे रेटिंग 761 आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेननेही एका स्थानाने झेप घेतली आहे. तो आता 756 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल देखील 740 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.
सहाव्या क्रमांकावर विराट कोहली...
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने सहाव्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे. तो आता 727 च्या रेटिंगवर पोहोचला आहे. आयर्लंडचा युवा खेळाडू हॅरी टेक्टर या वेळी तीन स्थानांनी मागे पडला आहे. तो आता 713 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर घसरला आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या चरित अस्लंकाने मोठी झेप घेतली आहे. तो आता आठ स्थानांनी पुढे गेला आहे. त्याचे रेटिंग 694 आहे. भारताच्या श्रेयस अय्यरलाही दोन स्थानांनी फायदा झाला आहे. तो 679 रेटिंगसह नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा शाई होप दोन स्थानांनी घसरला आहे. त्याचे रेटिंग 672 आहे आणि तो दहाव्या क्रमांकावर आहे.
