नवी दिल्ली : टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतात खेळण्याशिवाय दुसरा पर्याय बांगलादेशकडे राहिलेला नाही. बांग्लादेश क्रिकेट बोर्डानं वारंवार आयसीसीकडे श्रीलंकेत सामने खेळवण्याची मागणी केली होती. आयसीसीनं आता बांगलादेशला शेवटचा इशारा दिला आहे. बांगलादेशनं निश्चित झालेल्या वेळापत्रकाप्रमाणं भारतात सामने खेळावेत अन्यथा दुसऱ्या संघाला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी देऊ असं सांगण्यात आलं आहे.
बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. बांगलादेशच्या क्रिकेटपटूंच्या भारतातील सुरक्षेबाबत बीसीबीनं ज्या बाबी मांडल्या त्या आयसीसीनं स्वीकारल्याचं खोटं वक्तव्य देखील आसिफ नजरुल यांनी केलं होतं. नजरुल यांचं ते वक्तव्य खोटं असल्याचं समोर आलं होतं.
आयसीसीचा बांगलादेशला इशारा
भारतानं यापूर्वी वनडे वर्ल्ड कप, टी 20 वर्ल्ड कपचं यशस्वी आयोजन केलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं सुरक्षेबाबत ज्या गोष्टी मांडल्या होत्या, त्या आयसीसीनं मान्य केलेल्या नाहीत. बांगलादेशनं आता 21 जानेवारीपर्यंत त्यांचा अंतिम निर्णय घ्यावा. बांगलादेश भारतात खेळण्यास तयार नसेल तर त्यांची स्कॉटलँडला दिली जाऊ शकते, असा इशारा बांगलादेशला आयसीसीनं दिले आहेत.
आयसीसीच्या इशाऱ्यानुसार बांगलादेशला त्यांचे सामने भारतात खेळावे लागतील. बांगलादेश भारतात खेळण्यास तयार नसेल तर त्यांना टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर जावं लागेल. आयपीएलमधून मधून मुस्तफिजूर रहमानला वगळल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं त्यांचे सामने श्रीलंकेत खेळवावे, अशी मागणी पहिल्यांदा केली होती.
बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बांगलादेश सरकारच्या सांगण्यावरुन आयसीसीकडे भारतातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, आयसीसीच्या निर्णयानं बांगलादेशची बोलती बंद झाली आहे.
आयसीसीनं निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार बांग्लादेश सी ग्रुपमध्ये आहे. या गटात इंग्लंड, वेस्ट इंडीज, इटली आणि नेपाळ आहे. बांगलादेशचे सामने कोलकाता आणि मुंबईत होणार आहेत.
दरम्यान, बांगलादेशनं त्यांचा टी 20 वर्ल्ड कपमधील ग्रुप बदलावा अशी मागणी देखील केली होती. आयसीसीनं या मागणीकडे देखील दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय.
2026 च्या टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंकेकडून केलं जाणार आहे. पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होणार आहेत. याचाच आधार घेत बांगलादेश क्रिकेट बोर्डानं टी 20 वर्ल्ड कपमधील सामने श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली होती. मात्र, आयसीसीनं बांगलादेशची मागणी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळतं. या सर्व वादाची सुरुवात आयपीएलमधून कोलकाता नाईट रायडर्सनं मुस्तफिजूर रहमानला वगळल्यानंतर झाली होती. बांगलादेश सरकारनं आयपीएलच्या सामन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी देखील घातली आहे.
