IND vs WI 3rd ODI : ICCची मोठी कारवाई! तिसऱ्या वनडेनंतर भारत-वेस्ट इंडिज दोघांनाही एकाच वेळी सुनावली शिक्षा, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?
ICC Fined India and West Indies Team : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात न्यू चंदीगड येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर दोन्ही संघांवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली आहे.

ICC Fined India and West Indies Team : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात न्यू चंदीगड येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर दोन्ही संघांवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारत आणि वेस्ट इंडिजला निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. भारताला सामन्याच्या मानधनाच्या 20 टक्के, तर वेस्ट इंडिजला 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. वेळेची सवलत वगळल्यानंतर भारताचा संघ निर्धारित ओव्हर रेटपेक्षा चार षटके मागे होता. तर वेस्ट इंडिजचा संघ दोन षटके मागे असल्याचे आढळून आले.
The ICC have handed down sanctions to both sides following the third and final ODI between India and West Indies 🏏 https://t.co/CkqdR9hLxk
— ICC (@ICC) October 5, 2026
दोन्ही कर्णधारांनी आरोप स्वीकारले
या प्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदच्या मॅच रेफरी पॅनेलमधील प्रकाश भट्ट यांनी दंडाची कारवाई केली. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी स्लो ओव्हर रेटच्या आरोपांची कबुली दिली. त्यांनी प्रस्तावित केलेली शिक्षा स्वीकारल्यामुळे या प्रकरणावर औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता भासली नाही. या दोन्ही संघांवर स्लो ओव्हर रेटचे आरोप मैदानावरील पंच जयरामन मदनगोपाल आणि सॅम नोगाजस्की, तिसरे पंच शरफुद्दौला इब्ने शाहिद आणि चौथे पंच वीरेंद्र शर्मा यांनी ठेवले होते.
वेस्ट इंडिजने अखेरच्या वनडेत इतिहास रचला
विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजला या कारवाईचा फटका बसला असला तरी मैदानावर त्यांनी भारताविरुद्धच्या वनडे मालिकेचा शेवट ऐतिहासिक विजयाने केला. न्यू चंदीगडमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजने भारताने दिलेले 352 धावांचे आव्हान यशस्वीपणे पार केले. कर्णधार शाई होपने शानदार फलंदाजी करताना नाबाद 162 धावांची खेळी केली. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
आता टी-20 मालिकेकडे लक्ष
वेस्ट इंडिजने या सामन्यात विजय मिळवला असला तरी भारताने सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजने वनडे मालिकेचा शेवट विजयाने करत दौऱ्यात आपली छाप सोडली. वनडे मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघांचे लक्ष पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेकडे लागले आहे. या मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. वनडे मालिकेतील पराभवाचा हिशेब चुकता करण्यासाठी वेस्ट इंडिज मैदानात उतरेल, तर भारत टी-20 मालिकेतही आपले वर्चस्व कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे आगामी पाच सामन्यांची मालिका चांगलीच रंगण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -




















