ICC Drawing Fresh Schedule For T20 World Cup 2026 : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. याआधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुरुषांचा टी-20 वर्ल्ड कप 2026 हा 7 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 8 मार्च रोजी अंतिम सामना होईल. भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली हा बहुचर्चित स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
दरम्यान, इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आयसीसीकडे महत्त्वाची मागणी केली असून, भारतातील आपले सर्व सामने श्रीलंकेत हलवावेत, अशी विनंती केली आहे. या मागणीवर आयसीसीने गांभीर्याने दखल घेतली असून, चेअरमन जय शाह यांच्या नेतृत्वाखाली नव्या वेळापत्रकावर काम सुरू करण्यात आल्याचे समजते. ही मागणी अशा वेळी पुढे आली आहे, जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुस्तफिजूर रहमानला रिलीज करण्यास सांगितले होते.
खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी
रविवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत भारतात होणाऱ्या सामन्यांदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्याची परिस्थिती आणि बांगलादेश सरकारकडून मिळालेल्या सल्ल्याचा विचार करता, सध्या भारतात दौरा करणे संघासाठी सुरक्षित नाही, असा निष्कर्ष बोर्डाने काढला. आधी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, बांगलादेशला कोलकात्यात तीन तर मुंबईत एक सामना खेळायचा होता.
आयोजकांसमोर आव्हान
दरम्यान, बीसीसीआयशी संबंधित सूत्रांच्या मते स्पर्धेच्या इतक्या जवळ जाऊन सामन्यांचे वेन्यू बदलणे हे आयोजक आणि ब्रॉडकास्टर्ससाठी मोठे आव्हान ठरू शकते. लॉजिस्टिक्स, तिकीट विक्री आणि थेट प्रक्षेपणाशी संबंधित अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारताबाहेर सामने घेण्याची मागणी
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय कोणताही वाद वाढवण्यासाठी नसून, केवळ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला आहे. त्यामुळे आयसीसीने परिस्थितीची गंभीरता ओळखून बांगलादेशचे सर्व सामने भारताबाहेर, सुरक्षित ठिकाणी आयोजित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. श्रीलंका हा स्पर्धेचा सह-यजमान असला तरी, सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशचे सर्व ग्रुप स्टेज सामने भारतातच होणार आहेत. यामध्ये चारपैकी तीन सामने कोलकात्यात, तर एक सामना मुंबईत खेळवण्यात येणार आहे.
हे ही वाचा -
शिवीगाळ, कॉलर पकडून धमकी… गौतम गंभीरच्या रागाने एका खेळाडूचं करिअरच संपवलं! कोण आहे तो क्रिकेटपटू?