नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं (ICC Champions Trophy) आयोजन पाकिस्तान करणार आहे. भारतानं (Team India) पाकिस्तानमध्ये (Pakistan) क्रिकेट खेळण्यासाठी जायला नकार देत आशिया कप स्पर्धेप्रमाणं हायब्रीड मॉडेल चॅम्पियन्स ट्रॉफीत राबवण्याची मागणी केली आहे. दुबई किंवा श्रीलंकेत भारताचे सामने आयोजित करण्यात यावे, अशी भूमिका बीसीसीआयची असल्याच्या चर्चा आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकदा नव्हे तर चक्क तीन वेळा आमने सामने येऊ शकतात. ही दोन्ही देशांमधील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठर शकते.
भारत आणि पाकिस्तान तीन वेळा लढणार?
भारतात 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये पहिल्या आठ स्थानांवर असलेल्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीत प्रवेश मिळाला आहे. या आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश या संघांचा अ गटात समावेश आहे. ब गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा समावेश आहे. दोन्ही गटातील दोन टॉप संघ सुपर 4 मध्ये जातील. सुपर 4 मधून दोन संघ अंतिम फेरीत जातील.
भारत आणि पाकिस्तान हे एकाच गटात आहेत. यामुळं भारत आणि पाकिस्तान 1 मार्च 2025 ला आमने सामने येतील. दोन्ही संघांनी सुपर 4 मध्ये प्रवेश केल्यास तिथं दोन्ही संघ आमने सामने येतील. भारत आणि पाकिस्तान सुपर फोरमध्ये टॉप 2 मध्ये राहिल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आमने सामने येतील.
भारत पाकिस्तानमध्ये जाणार?
भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी न जाण्याची भूमिका घेतलेली आहे. बीसीसीआयच्या मागणीनुसार हायब्रीड मॉडेल आयसीसीनं लागू केल्यास भारत या स्पर्धेत सहभागी होईल. भारतानं त्रयस्थ ठिकाणी सामने खेळण्याची तयारी दर्शवली आहे. दुबई आणि श्रीलंकेतील एका ठिकाणी सामने खेळवावेत, अशी भारताची भूमिका आहे. पाकिस्तानची भूमिका संपूर्ण स्पर्धा आपल्या देशात व्हावी, अशी इच्छा आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सुरक्षेच्या कारणानुसार भारताचे सामने लाहोरमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्या विरोधात सामने खेळेल. पाकिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात आयसीसीला सोपवलेल्या वेळापत्रकानुसार 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात येणार आहे.
भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सहभाग नसला तरी आयसीसीनं स्पर्धेच्या आयोजनासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला आहे. भारताचं मन वळवण्याची जबाबदारी पाकिस्ताननं आयसीसीवर सोपवल्याच्या चर्चा आहेत.
संबंधित बातम्या :