Hardik Pandya Trade IPL 2027 : आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे. हार्दिकला ट्रेड करण्याच्या चर्चा आयपीएलचा मागील हंगाम संपण्यापूर्वीच सुरू झाल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्स (KKR), चेन्नई सुपर किंग्स (CSK), लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या संघांना हार्दिकमध्ये रस असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, हार्दिक पंड्याच्या ट्रेडबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. उलट मुंबई इंडियन्सने हार्दिकला ट्रेडसाठी उपलब्ध करून दिले आहे की नाही, हेही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे हार्दिक खरंच मुंबईची साथ सोडणार का, याबाबत सस्पेन्स कायम आहे.
मुंबई इंडियन्स हार्दिकला कायम ठेवणार?
काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्याचा KKRमध्ये जाण्याचा मार्ग जवळपास निश्चित झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, क्रिकबझच्या रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्सने हार्दिकला ट्रेड करण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. मुंबई इंडियन्सशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, फ्रँचायझी हार्दिकला संघात कायम ठेवण्याचाही विचार करू शकते. त्यामुळे हार्दिकच्या ट्रेडबाबत सुरू असलेल्या चर्चांना सध्या अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी काही फ्रँचायझींनी मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाशी प्राथमिक चर्चा केल्याचे समोर आले आहे. मात्र, या चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात असून कोणत्याही ट्रेडवर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही.
हार्दिकसाठी अनेक संघ उत्सुक
हार्दिक पंड्या हा वेगवान गोलंदाजी करू शकतो, मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करू शकतो आणि त्याच्याकडे कर्णधारपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे त्याच्यासारखा भारतीय ऑलराऊंडर मिळवण्याची संधी कोणताही संघ सहज सोडणार नाही. गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिकने संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर तो मुंबई इंडियन्समध्ये परतला. मात्र, 2024 मध्ये मुंबईत पुनरागमन केल्यानंतर त्याच्या कामगिरीत सातत्याने अपेक्षित प्रभाव दिसून आलेला नाही. कर्णधार म्हणूनही त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तरीही भारतीय खेळाडू म्हणून त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. फलंदाजीसोबत वेगवान गोलंदाजी करण्याची क्षमता असलेला हार्दिक आजही फ्रँचायझींसाठी मोठी संपत्ती मानला जातो.
KKRला हार्दिक हवा, पण मोठा खेळाडू सोडण्यास तयार नाही
कोलकाता नाईट रायडर्स हार्दिकला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याचे वृत्त आहे. मात्र, हार्दिकला संघात सामील करण्यासाठी KKR आपल्या विद्यमान मोठ्या खेळाडूंपैकी कोणाला सोडणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. KKR कोणत्याही मोठ्या खेळाडूला रिलीज करण्याच्या तयारीत नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे हार्दिकचा ट्रेड करण्यासाठी आवश्यक असलेली खेळाडूंची अदलाबदल कशी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरून ग्रीनच्या बाबतीतही परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही. पुढील काळात ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर इंग्लंडमध्ये अॅशेस मालिकाही होणार आहे. त्यामुळे ग्रीनच्या पुढील आयपीएल हंगामातील उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
CSKचे हार्दिकपेक्षा सध्या दुसऱ्याच गोष्टीवर लक्ष
चेन्नई सुपर किंग्सचे नावही हार्दिक पंड्याच्या ट्रेडशी जोडले जात आहे. मात्र, CSKने हार्दिकला संघात घेण्यासाठी अधिकृतपणे कोणतीही हालचाल केली आहे का, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. CSKचे CEO काशी विश्वनाथन यांनी क्रिकबझशी बोलताना सध्या हार्दिकच्या ट्रेडपेक्षा प्रशिक्षकाच्या नियुक्तीला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.
हे ही वाचा -
