Hardik Pandya IPL Trade Deal CSK and MI : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी (IPL 2027) ट्रेड विंडो खुली असून, सध्या क्रिकेट जगतात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्या नावाचीच सर्वाधिक चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक असून, त्याच्या बदल्यात शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस आणि 10 कोटी रुपये रोख रक्कम देण्यास तयार असल्याची अफवा पसरली आहे. जरी दोन्ही फ्रँचायझींकडून यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नसले, तरी भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक आकाश चोप्रा यांनी या संभाव्य ट्रेडवर आपले स्पष्ट मत मांडले आहे. आकाश चोप्रा यांच्या मते, हा ट्रेड दोन्ही संघांसाठी फायदेशीर ठरणारा नाही.

Continues below advertisement

मुंबई इंडियन्सला फलंदाजांची नाही, तर गोलंदाजांची गरज

आकाश चोप्रा यांनी या ट्रेड डीलवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, मुंबई इंडियन्सने (MI) जर हार्दिक पांड्याला सोडले आणि त्याच्या बदल्यात शिवम दुबे व डेवाल्ड ब्रेविस या दोन मध्यक्रमातील फलंदाजांना संघात घेतले, तर ते या दोन फलंदाजांचे करणार काय? मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आधीच दर्जेदार फलंदाज आहेत. त्यांना सध्या चांगल्या गोलंदाजांची खरी गरज आहे. जर मुंबईला हार्दिकचा ट्रेड करायचाच असेल, तर त्यांनी बदल्यात एखाद्या उत्कृष्ट गोलंदाजाची मागणी करायला हवी, कारण चांगल्या गोलंदाजांशिवाय मुंबईचे काम चालणार नाही.

Continues below advertisement

चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) नुकसानच जास्त

हा ट्रेड केवळ मुंबईसाठीच नाही, तर चेन्नई सुपर किंग्जसाठीही तोटा ठरण्याची शक्यता आकाश चोप्रा यांनी वर्तवली आहे. हार्दिक पांड्याच्या येण्याने सीएसके मधील एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची पोकळी नक्कीच भरेल. मात्र, त्याच्या बदल्यात शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेविस हे दोन महत्त्वाचे मध्यक्रमातील फलंदाज गमावल्यामुळे चेन्नईच्या फलंदाजीची फळी कमकुवत होईल. दोन महत्त्वाचे फलंदाज दिल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजीत पुन्हा नवीन समस्या निर्माण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मानले जातात, परंतु सध्या दोन्ही संघ आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनच्या शोधात आहेत. 2020 च्या हंगामानंतर मुंबईला एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. इतकेच नव्हे तर गेल्या 3 पैकी 2 हंगामात त्यांना प्लेऑफमध्येही प्रवेश करता आलेला नाही. 2023 मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर गेल्या हंगामात चेन्नईची कामगिरीही चढ-उताराची राहिली आहे. आकाश चोप्रा यांच्या विश्लेषणानुसार, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस आणि 10 कोटी रुपयांच्या बदल्यात हार्दिक पांड्याचा हा ट्रेड कागदावर जितका रंजक वाटतो, तितका तो दोन्ही संघांच्या व्यावहारिक गरजेनुसार योग्य नाही. त्यामुळे हा ट्रेड होणे कठीण दिसते.

हे ही वाचा -

India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर