Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेसाठी आज टीम इंडियाची घोषणा होणार आहे. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी आज भारतीय संघाची निवड होणार आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका गमावल्याचा फटका हार्दिक पांड्याला सहन करावा लागू शकतो. हार्दिक पांड्याला उपकर्णधारपदावरून हटवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. आयर्लंडमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळणाऱ्या जसप्रीत बुमराहला नवा उपकर्णधार बनवण्याची शक्यता आहे.
पांड्याचे उपकर्णधारपद धोक्यात ?
आशिया चषकात हार्दिक पांड्या याचे उपकर्णधारपद धोक्यात आलेय. वेस्ट इंडिजमध्ये हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वात उणीवा जाणवल्यामुळे टीम मॅनेजमेंट विचार करत आहे. जसप्रीत बुमराह याच्या नावाचाही निवड समिती विचार करु शकते. आयर्लंड दौऱ्यात त्यामुळेच जसप्रीत बुमराह याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलेय. त्याशिवाय 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा उपकर्णधार होता. आता आशिया चषक आणि वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये उपकर्णधारपदासाठी रेस असेल.
कोण होणार उपकर्णधार ?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या याने निराशाजनक कामगिरी केली. हार्दिक पांड्याच्या निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. एवढेच नाही तर कर्णधारपदाचे दडपणही हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर दिसून आले. वेस्ट इंडिज दौऱ्यावर कर्णधारपदाव्यतिरिक्त हार्दिक पांड्याने बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत निराश केले. इतकंच नाही तर हार्दिक पांड्याच्या वक्तव्यावरुनही वाद निर्माण झाला होता. दुसरीकडे बुमराहच्या नेतृत्वाने सर्वांनाच प्रभावित केलेय.
आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराहने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे त्याच्याकडे पुन्हा उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षी रोहित शर्माला टीम इंडियाचा कर्णधार बनवताना निवडकर्त्यांनी जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे नेतृत्व गटाचा एक महत्त्वाचा भाग असतील असे विधान केले होते. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने पाचव्या कसोटीतही टीम इंडियाची कमान सांभाळली होती.
जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत युवा खेळाडूंसोबत चांगला समन्वय दाखवला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यातही बुमराहने असे निर्णय घेतले ज्यामुळे टीम इंडियाने सामना हाताबाहेर जाऊ दिला नाही. गोलंदाजांचा वापर करण्याच्या बाबतीतही बुमराहने प्रभावी निर्णय घेतले. त्यासोबतच स्वत:ची कामगिरीनेही प्रभावित केले. आज आशिया चषकासाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे.