Hardik Pandya Likely to Leave Mumbai Indians : आयपीएल 2026 चा हंगाम 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत निराशाजनक राहिला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने 14 सामन्यांपैकी फक्त 4 सामने जिंकले आणि गुणतालिकेत संघ नवव्या क्रमांकावर राहिला. गेल्या हंगामापासूनच मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. संघ दोन गटात विभागला गेल्याचेही बोलले जात होते, ज्याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला. आता समोर येणाऱ्या रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो. अर्थात, याबाबत अद्याप हार्दिक किंवा मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सूर्या आणि बुमराहऐवजी 'या' युवा खेळाडूला मिळू शकते कमान (Why Tilak Varma is Leading the Race Over Surya and Bumrah)

जर हार्दिक पांड्याने संघ सोडला, तर मुंबई इंडियन्सचा पुढील कर्णधार कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांच्या मनात सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराह यांची नावे येत आहेत, कारण रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्यांनी यापूर्वी जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, मुंबई इंडियन्स भविष्याचा विचार करून तिलक वर्माकडे नेतृत्व सोपवू शकते. आयपीएल 2026 मध्ये मुंबईचे बडे बडे फलंदाज अपयशी ठरत असताना, तिलक वर्माने एकट्याने दोन सामने जिंकवून दिले. गुजरात टायटन्सविरुद्ध तिलकने शानदार शतक ठोकून संघाला विजय मिळवून दिला. तर पंजाब किंग्सविरुद्ध नाबाद 75 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सूर्याचा घसरलेला फॉर्म अन् बुमराहचा 'वर्कलोड मॅनेजमेंट'

दुसरीकडे, सूर्यकुमार यादवचा फॉर्म आधीसारखा राहिलेला नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात तो अपयशी ठरत असल्याने व्यवस्थापन त्याच्याकडे दीर्घकालीन कर्णधार म्हणून पाहण्यास कचरत आहे. जसप्रीत बुमराह हा भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक पाहता, बुमराहला दुखापतींपासून वाचवण्यासाठी वारंवार विश्रांती (Rest) दिली जाते. मुंबई इंडियन्सला असा कर्णधार हवा आहे जो सर्व सामन्यांसाठी नियमित उपलब्ध असेल, ज्यामुळे बुमराहचा पत्ता कट होऊ शकतो.

रोहित शर्माकडे असणार मोठी जबाबदारी (Rohit Sharma Key Role in  Selection)

रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सचा माजी यशस्वी कर्णधार रोहित शर्मा स्वतः पुढचा कर्णधार निवडण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. रोहितकडे असलेल्या अनुभवाचा फायदा घेऊन, भविष्यासाठी सक्षम संघ तयार करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली जाऊ शकते. तिलक वर्माच्या नावावर रोहित शर्मा देखील शिक्कामोर्तब करू शकतो, कारण तिलकमधील नेतृत्वगुण रोहितने जवळून पाहिले आहेत.

हे ही वाचा -

Riyan Parag-Vaibhav Sooryavanshi : स्वतः फ्लॉप, पण 96 धावा करणाऱ्या वैभववर भडकला कर्णधार रियान पराग; डगआउटमध्ये कॅप्टनचा 'तो' हाय व्होल्टेज ड्रामा; पाहा Video