Hardik Pandya Trade Update IPL 2027 : आयपीएल 2027 च्या आधी भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या चर्चांपैकी एक म्हणजे हार्दिक पांड्या पुढील हंगामात कोणत्या संघाकडून खेळणार? मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिकबाबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ट्रेडच्या चर्चा रंगत आहेत. सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्स (CSK) ही त्याची सर्वात मोठी दावेदार मानली जात होती. मात्र आता चित्र बदलल्याचे दिसत असून कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हार्दिकला आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी गंभीर असल्याची चर्चा आहे.
KKR कडून हार्दिकला मोठी ऑफर?
रेवस्पोर्ट्जच्या वृत्तानुसार, केकेआरने हार्दिक पांड्यासाठी दार उघडे ठेवले आहेत. इतकेच नव्हे, तर त्याला संघात घेतल्यास कर्णधारपदाची जबाबदारीही देण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन हंगामांत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली केकेआरला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला अनुभवी आणि आक्रमक खेळाडूची गरज आहे. हार्दिक या निकषांवर पूर्णपणे फिट बसतो. तो मधल्या फळीत धडाकेबाज फलंदाजी करू शकतो, महत्त्वाच्या क्षणी वेगवान गोलंदाजी करू शकतो आणि नेतृत्वाची जबाबदारीही प्रभावीपणे सांभाळू शकतो.
ट्रेड की थेट कॅश डील?
सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हार्दिकचा व्यवहार नेमका कसा होणार आहे. केकेआर मुंबई इंडियन्ससोबत खेळाडूंची अदलाबदल (Trade) करणार की थेट आर्थिक व्यवहार (Cash Deal) करणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. केकेआरकडे ट्रेडसाठी फारसे आकर्षक पर्याय नसल्याने कॅश डीलची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. मात्र मुंबई इंडियन्स हार्दिकसारख्या स्टार खेळाडूला सहज सोडेल का, हा प्रश्न कायम आहे.
कॅमेरून ग्रीनच्या जागी हार्दिक?
या चर्चेत आणखी एक मोठे नाव म्हणजे कॅमेरून ग्रीन आहे. आयपीएल 2026 च्या लिलावात ग्रीनवर 25.2 कोटी रुपयांची बोली लागली होती. केकेआरकडे आधीच वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू असल्याने हार्दिक संघात आल्यास दोघांना एकत्र खेळवणे अवघड ठरू शकते. त्यामुळे ग्रीन आणि हार्दिक यांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर ग्रीनला मिळालेल्या जवळपास 25 कोटी रुपयांच्या करारमूल्यावरच हार्दिकला केकेआर करारबद्ध करू शकते, अशीही चर्चा आहे. मात्र मुंबई इंडियन्स फक्त ग्रीनच्या बदल्यात हार्दिकला सोडेल, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही.
CSK चा प्लॅन काय होता?
हार्दिकच्या ट्रेडबाबत काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये चर्चा सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सुरुवातीला हार्दिकच्या बदल्यात आयुष म्हात्रे आणि शिवम दुबे यांची नावे चर्चेत होती. त्यानंतर सीएसकेने शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेविस यांचा पर्याय मुंबईसमोर ठेवल्याचेही वृत्त होते. मात्र आता केकेआर या शर्यतीत उतरल्याने संपूर्ण समीकरण बदलले आहे. त्यामुळे हार्दिक अखेर कोणत्या संघात जाणार, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा -
