Rajasthan Royals vs Gujarat Titans IPL 2026 : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 52 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने दमदार कामगिरी करत राजस्थान रॉयल्सवर 77 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली असून प्लेऑफची शर्यत आणखी रंगतदार बनली आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत 4 विकेट्स गमावत तब्बल 229 धावांचा डोंगर उभा केला. कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला सुरुवातीपासूनच मोठे फटके बसले आणि राजस्थानचा डाव 152 धावांवर आटोपला. अखेर शुभमन गिल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने 50 धावांनी दणदणीत विजय नोंदवला.

Continues below advertisement

शुभमन गिल अन् साई सुदर्शनची तुफानी सुरूवात  

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सच्या डावाची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी केली. या दोघांनी गुजरातसाठी पहिल्या विकेटसाठी 118 धावांची शानदार भागीदारी केली, पण त्यानंतर यश पुंजाने साई सुदर्शनला बाद करून गुजरातला आघाडी मिळवून दिली. साई सुदर्शनने 36 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांसह 55 धावा केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाने जोस बटलरला बाद करून गुजरातला आणखी एक धक्का दिला. गिलने 44 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह 84 धावा केल्या. त्यानंतर जेसन होल्डर 7 धावांवर ब्रिजेश शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला.

Continues below advertisement

शेवटी वॉशिंग्टन सुंदर अन् राहुल तेवतियाचा धमाका!

शेवटच्या षटकांमध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया यांनी स्फोटक खेळी करत गुजरातचा डाव 229 धावांपर्यंत नेला. वॉशिंग्टन सुंदरने 20 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 37 धावा केल्या. राहुल तेवतियाने 4 चेंडूंमध्ये 14 धावांची नाबाद छोटी पण वेगवान खेळी केली. जोस बटलरने 13 धावांचे योगदान दिले. ब्रिजेश शर्माने राजस्थानसाठी दोन बळी घेतले. यश पुंजा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

राशिद खानची फिरकी ठरली घातक

धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. कर्णधार यशस्वी जैस्वाल फक्त 3 धावा काढून बाद झाला. मात्र, वैभव सूर्यवंशीने अवघ्या 16 चेंडूत 36 धावा (3 चौकार, 3 षटकार) कुटत डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला. ध्रुव जुरेलनेही 10 चेंडूत 24 धावांची फटकेबाजी केली, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. मध्यफळीत रवींद्र जडेजाने 25 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले, परंतु तो संघाला सावरू शकला नाही. गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खानने आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 33 धावा देऊन 4 महत्त्वाचे बळी टिपले. त्याने ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, शुभम दुबे आणि अनुभवी रवींद्र जडेजा यांना बाद करून राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. कागिसो रबाडानेही दोन गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली.

गुणतालिकेत मोठी उलथापालथ (IPL 2026 Points Table)

या विजयाचा सर्वात मोठा परिणाम आयपीएल 2026 च्या पॉइंट्स टेबलवर पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सने थेट पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गुजरातचे आता 11 सामन्यांत 14 गुण झाले आहेत. पहिल्या स्थानावर सनरायझर्स हैदराबाद कायम आहे. हैदराबादचेही 14 गुण आहेत, मात्र नेट रनरेट अधिक चांगला असल्यामुळे त्यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे.

पंजाब, आरसीबी आणि राजस्थानला मोठा धक्का

दरम्यान, पंजाब किंग्सला एका स्थानाचा फटका बसला असून संघ दुसऱ्यावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. पंजाबचे 10 सामन्यांत 13 गुण आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघालाही धक्का बसला आहे. आरसीबी आता तिसऱ्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर घसरला असून त्यांच्या खात्यात 10 सामन्यांत 12 गुण आहेत. 

सर्वात मोठा धक्का मात्र राजस्थान रॉयल्सला बसला आहे. या पराभवानंतर राजस्थान टॉप-4 मधून बाहेर फेकला गेला आहे. राजस्थानचे 11 सामन्यांत 12 गुण असले तरी खराब नेट रनरेटमुळे त्यांना खाली घसरावे लागले आहे. आयपीएल 2026 मध्ये आता प्रत्येक सामना पॉइंट्स टेबलचे चित्र बदलताना दिसत असून प्लेऑफच्या शर्यतीत जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे.

हे ही वाचा -

Ravindra Jadeja Celebration : IPL मध्ये नवा ड्रामा! बटलरचा विकेट घेताच जडेजाचं सेलिब्रेशन पाहून सगळेच चक्रावले, मैदानात नेमकं काय घडलं?