IND vs ENG Wankhede Report Marathi News : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सेमीफायनल आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र या मोठ्या सामन्यापूर्वीच पिचबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पिचचे काही फोटो समोर आल्यानंतर त्यावर हिरवळ दिसत असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल का, अशी चर्चा रंगली आहे. वानखेडेची पिच पारंपरिकरीत्या फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते, पण सध्याची परिस्थिती पाहता टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये थोडी चिंता निर्माण झाली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा पिच क्युरेटरसोबतचा एक फोटोही समोर आला होता, ज्यात ते काहीसे नाराज दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Continues below advertisement

बॉलिंग कोच मोर्ने मोर्कलला दव पडण्याची चिंता

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल यानेही सामन्यात ओस पडण्याच्या शक्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तो म्हणाला, “दव हा नेहमीच एक मोठा घटक असतो. मात्र ही अशी गोष्ट आहे जी आपल्या नियंत्रणात नसते. वानखेडेवर सहसा थोडा जास्त बाउन्स मिळतो आणि गोलंदाज त्याचा फायदा घेऊ शकतात.” 

Continues below advertisement

मोर्कल पुढे म्हणाला, “येथे मार्जिन खूप कमी असतात. मैदान लहान असल्यामुळे चेंडू लवकर सीमारेषेबाहेर जातो. त्यामुळे प्रत्येक षटकात लढत राहणे आणि प्रत्येक चेंडूसाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. या पिचवर फलंदाजांची ताकदच कधी कधी त्यांची कमकुवत बाजू ठरू शकते. कधी कधी बचावात्मक खेळण्यापेक्षा आक्रमक राहणे अधिक फायदेशीर ठरते.”

वानखेडेच्या पिचचा सामन्यावर काय परिणाम होऊ शकतो?

वानखेडेच्या पिचवर सध्या हिरवळ दिसत आहे. सेमीफायनलपूर्वी पिचमध्ये ओलसर टिकवून ठेवण्यासाठी ही हिरवळ जाणीवपूर्वक ठेवण्यात आली आहे. ही लाल मातीची पिच असल्यामुळे घासामुळे ओलावा टिकून राहतो आणि पिच लवकर कोरडी पडत नाही.

सामन्याच्या सुरुवातीला घास आणि लाल मातीच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे चेंडूला चांगला बाउन्स आणि कॅरी मिळू शकतो. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना सीम मूव्हमेंटसह अतिरिक्त उंचीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः पॉवरप्लेमध्ये ते फलंदाजांना अडचणीत टाकू शकतात.

मात्र, सामना जसजसा पुढे जाईल तसतशी पिच थोडी बसू शकते. त्यामुळे मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळण्याची शक्यता आहे, विशेषतः घास झिजल्यावर किंवा पिच थोडी खडबडीत झाल्यावर. एकूणात ही पिच अजूनही फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते आणि 200 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात ओस निर्णायक भूमिका बजावू शकते.

टीम इंडियाच्या रणनीतीत बदल होणार का?

पिचबाबत चर्चा रंगू लागल्यानंतर भारतीय संघाच्या अंतिम अकराबाबतही अंदाज बांधले जात आहेत. अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी दिली जाईल का? मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळेल का? अशा प्रश्नांची चर्चा सध्या सुरू आहे.

पण, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेवनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता कमी मानली जाते. पण जर सामन्याच्या दिवशीही पिच हिरवी दिसली, तर फलंदाजांसाठी आव्हान वाढू शकते आणि वेगवान गोलंदाजांना मोठा फायदा मिळू शकतो. त्यामुळे अंतिम निर्णय काय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा -

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding: धोनी, झहीर, युवराज, ठाकरे...अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक यांच्या विवाह सोहळ्याला कोण-कोण?, PHOTO