Gautam Gambhir Reaction As Ravindra Jadeja IND vs SL Warm-up Match : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा वॉर्म-अप सामना सुरू असून, दुसऱ्या दिवशी मैदानावर एक भन्नाट आणि मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने चक्क सहकारी फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीच्या अनोख्या अॅक्शनची कॉपी करत होता. जडेजाने कुलदीपचा अॅक्शन इतका भन्नाट पद्धतीने कॉपी केला की, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही आपले हसू आवरता आले नाही. या मजेशीर क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जडेजाने केली कुलदीपच्या अॅक्शनची कॉपी (Ravindra Jadeja Imitates Kuldeep Yadav Bowling Style)
वॉर्म-अप सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जडेजाने मैदानावर कुलदीपच्या गोलंदाजीच्या अॅक्शनची नक्कल करत वातावरण हलकंफुलकं केलं. कुलदीप हा आपल्या मनगटाच्या वेगळ्या हालचाली आणि खास बॉलिंग अॅक्शनसाठी ओळखला जातो. जडेजाने त्याच अॅक्शनला थोडं अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने सादर केलं. जडेजाचा हा अंदाज पाहून जवळच असलेल्या गौतम गंभीर यांनाही हसू आवरता आलं नाही. गंभीरची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली असून, हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कसोटी मालिकेपूर्वी खेळाडूंवरील दबाव कमी करण्यासाठी अशा मजेशीर क्षणांचं महत्त्वही मोठं असतं. भारतीय संघासाठी हा सामना परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
जडेजा-कुलदीपची फिरकी ठरली प्रभावी (IND vs SL Warm-up Match)
वॉर्म-अप सामन्यात जडेजा आणि कुलदीप या दोन्ही फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली. जडेजाने तब्बल 15 षटकं गोलंदाजी करताना 64 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने पसिंदु सूरियाबंदराला आणि रमेश मेंडिसला माघारी पाठवलं. दुसरीकडे कुलदीप यादवने 18 षटकांचा मोठा स्पेल टाकला. त्याने 76 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या. अहान विक्रमसिंघे आणि अंजाला बंदारा हे त्याचे बळी ठरले. भारताकडून मानव सुथारनेही आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं. त्याने 13 षटकांत केवळ 33 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
जडेजाची संयमी अर्धशतकी खेळी (Ravindra Jadeja IND vs SL Warm-up Match)
जडेजाने 117 चेंडूंचा सामना करत 63 धावांची संयमी खेळी केली. त्याच्या डावात सात चौकारांचा समावेश होता. भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर जडेजाने डाव सावरण्याची जबाबदारी घेतली. त्याच्या संयमी फलंदाजीमुळे भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांना मैदानावर स्थिरावण्यासाठी वेळ मिळाला. विशेष म्हणजे जडेजा 63 धावांवर रिटायर्ड आउट झाला. इतर फलंदाजांना जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करण्याची संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश होता.
भारत फक्त 6 धावांनी मागे
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 6 विकेट्स गमावत 357 धावा केल्या होत्या. श्रीलंकाने 363/8 वर डाव घोषित केल्यामुळे भारत आता अवघ्या 6 धावांनी पिछाडीवर आहे. देवदत्त पडिक्कलच्या शतकाने भारताच्या पुनरागमनाची पायाभरणी केली. त्यानंतर जडेजा, सुथार आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे भारताने सामना पुन्हा आपल्या बाजूने खेचला.
हे ही वाचा -
