Gautam Gambhir on Virat Kohli Retirement : भारताचा महान कसोटी कर्णधार विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी टी-20 ला रामराम ठोकणाऱ्या कोहलीने आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा म्हटले. तो या फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे. कोहलीने सोमवारी (12 मे) इंस्टाग्रामवर कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. सर्वांनी त्याच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली.

कोहलीने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी 40 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला. या काळात टीम इंडियाला 17 सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कधीही घरच्या मैदानावर कसोटी सामना गमावला नाही. टीम इंडियाने 11 पैकी 10 मालिका जिंकल्या आणि एक अनिर्णित राहिली. विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर कोच गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

गंभीरने काय लिहिले? 

टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही विराट कोहलीसाठी पोस्ट केली. त्याने कोहलीचा एक अद्भुत फोटो शेअर केला आणि त्याची तुलना सिंहाशी केली. गंभीरने पोस्टवर लिहिले, "सिंहाचं काळीज असलेला माणूस! विल मिस यू चिकू..." कोहलीचे टोपणनाव 'चिकू' आहे. विराटने त्याच्या कर्णधारपदाखाली भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार आहे.

विराट कोहली निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाला? 

कसोटी क्रिकेटमध्ये ‘बॅगी ब्लू’ (भारताची टोपी) प्रथमच परिधान करून आज 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला कुठे घेऊन जाईल, याची कल्पनाही नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आणि आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी शिकवल्या.

भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला हृदयात वेगळं स्थान असतं. कसोटी क्रिकेट म्हणजे परीक्षा घेणारा, दीर्घ आणि संघर्ष पाहणारा फॉरमॅट आहे. हा फॉरमॅट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्षणांचा आनंद देतो, जो आयुष्यभरासाठी आठवणी म्हणून सोबत असतो.  या फॉरमॅटपासून दूर जाणं सोपं नाही,  पण हा निर्णय आता योग्य वाटतोय. मी कसोटी क्रिकेटला माझं सर्वस्व दिलं, पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त; अगदी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त या खेळाने मला परत दिलंय.

मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत आहे. या खेळासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी, मला समजून घेणाऱ्यांसाठी आणि साथ देणाऱ्यांसाठी माझं मन कृतज्ञतेने भरून आलंय, माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञताच आहे.

मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे  नेहमीच हसतमुखाने पाहीन!