Dodda Ganesh On Shardul Thakur: भारतीय संघ विश्वचषकात दमदार फॉर्मात आहे. भारतीय संघ आतापर्यंत अजेय आहे. चारही सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने आठ गुणांची कमाई केली आहे. या सामन्यात शार्दूल ठाकूर याची कामगिरी सरासरी राहिली आहे. शार्दूल ठाकूर याला आतापर्यंत तीन सामन्यात संधी मिळाली, पण तो भेदक मारा करु शकला नाही. शार्दूल ठाकूर धावाही खर्च करत आहे. त्याशिवाय त्याला विकेटही घेता येत नाहीत. हाच धागा पकडत भारताचा माजी गोलंदाज डोडा गणेश याने शार्दुल ठाकूरवर टीका केली आहे. त्याशिवाय त्याच्या प्लेईंग 11 मधील स्थानावरही टीका केली आहे. शार्दूल ठाकूर कर्नाटकच्या संघातही स्थान मिळवू शकत नाही, भारतीय संघातील स्थान तर दूरची गोष्ट आहे, असे डोडा गणेश यांनी म्हटले आहे. 


भारताचा माजी खेळाडू डोडा गणेश यांनी ट्वीट करत शार्दूलच्या प्लेईंग 11 मधील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, गोलंदाज म्हणून शार्दूल ठाकूर कोणत्याही प्रकारात कर्नाटकच्या संघातही जागा मिळवू शकत नाही. त्याला संघर्ष करावा लागेल. भारतीय संघातील स्थान तर दूरची गोष्ट आहे, असे म्हटलेय. शार्दुल ठाकूरला पूर्ण आदर देऊन, गोलंदाजीच्या जीवावर तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये कर्नाटकच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करेल, भारतीय संघात स्थान मिळण तर सोडाच, असे ट्वीट केले आहे..






विश्वचषकात शार्दूल फेल - 


शार्दूल ठाकूर विश्वचषकात भारताकडून तिसऱ्या गोलंदाजाची भूमिका बजावत आहे. पण त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. शार्दूल ठाकूर याने तीन सामन्यात फक्त दोन विकेट घेतल्या आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरोधात शार्दूल ठाकूर याला एक एक विकेट मिळाली होती. पाकिस्तानविरोधात शार्दूलच्या खात्यात एकही विकेट मिळाली नव्हती. बांगलादेशविरोधात शार्दूल ठाकूरने 9 षटकात 59 धावा खर्च केल्या होत्या. शार्दूल ठाकूर याला एकाही सामन्यात प्रतिस्पर्धी फलंदाजांना धावा करण्यापासून रोखता आले नाही.


शार्दूलचे वनडे करिअर कसे राहिलेय ? 


शार्दूल ठाकूरने 2017 मध्ये श्रीलंकाविरोधात टीम इंडियाच्या वनडे संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने 47 एकदिवसीय सामने खेळले आहेत. शार्दूल ठाकूर याने 30.98 च्या सरासरीने 65 विकेट घेतल्या आहेत. प्रति षटक 6.62 धावा शार्दूल ठाकूरने खर्च केल्या आहेत. शार्दूल ठाकूर टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत आहे.