Continues below advertisement

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी भारताचा संघ जाहीर केला. वनडे मालिकेसाठी भारताच्या संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आलं. तर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्मानं भारताचं वनडेमध्ये कर्णधारपद भूषवलं होतं. आता आगामी वनडे वर्ल्ड कप लक्षात घेता बीसीसीआयनं शुभमन गिलकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. बीसीसीआयकडून संघ जाहीर करताच विराट कोहलीच्या नावासोबत जोडून एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. रोहित शर्मा ऐवजी शुभमन गिलला कॅप्टन केल्यानंतर ती पोस्ट विराट कोहलीकडून करण्याता आल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र, या व्हायरल पोस्टचं सत्य आपण जाणून घेणार आहोत.

Virat Kohli Viral Post : विराट कोहलीच्या नावे व्हायरल पोस्ट

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्मा ऐवजी कर्णधार पद शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. संघ जाहीर होताच विराट कोहलीच्या नावानं एक पोस्ट व्हायरल केली जात आहे. त्या पोस्टनुसार विराट कोहलीनं संघनिवडीनंतर इन्स्टाग्रामवर एक ठेवली. जी लोकांकडून रोहित शर्मासोबत जोडली जातेय.

Continues below advertisement

विराट कोहलीच्या नावानं व्हायरल होत असलेल्या स्टोरीत Karma असं लिहिण्यात आलं आहे. त्यानंतर जीवन एक बुमरँग आहे, जे तुम्ही देता ते तुम्हाला मिळतं, असा उल्लेख त्या व्हायरल पोस्टमध्ये आहे. बीसीसीआयनं विराट कोहलीनंतर रोहित शर्माला भारताचं कर्णधार केलं होतं. आता रोहित शर्मानंतर शुभमन गिलला कर्णधार केलं आहे.

व्हायरल पोस्टचं सत्य

विराट कोहलीच्या नावानं व्हायरल होत असलेली इन्स्टाग्राम स्टोरीची पोस्ट खोटी आहे. एखाद्या यूजरनं एआयच्या मदतीनं फोटो विराट कोहलीच्या नावानं शेअर केला आणि त्यानंतर स्टोरी ठेवल्यानंतर 10 मिनिटांनी विराटनं ती डिलिट केल्याचा दावा केला. मात्र, विराट कोहलीनं अशा स्वरुपाची इन्स्टाग्राम स्टोरी ठेवलेली नाही. व्हायरल पोस्टमधील विराट कोहलीची प्रोफाईल ईमेज आणि विराट कोहलीच्या खऱ्या इन्स्टाग्राम खात्याची प्रोफाईल इमेज वेगळी आहे. यावरुन स्पष्ट होतं की व्हायरल स्टोरी विराट कोहलीची नाही. विराट कोहलीनं कोणतीही स्टोरी इन्स्टाग्रामवर ठेवली नाही, व्हायरल पोस्ट केवळ खोटं पसरवण्यासाठी बनवली गेल्याचं स्पष्ट होतं.