England Test team announced for India tour : भारत दौऱ्यासाठी इंग्लंडच्या (ENG vs IND) कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडचा संघ (England Team) जानेवारी-फेब्रुवारी 2024 दरम्यान भारताविरोधात (IND vs ENG) पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना हैदाराबद येथे 26 जानेवारीपासून सुरु होणार आहे.  बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील 16 जणांच्या चमूची घोषणा करण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स याला संघात स्थान मिळाले नाही. इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने तीन नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये दोन फिरकी आणि एका वेगवान गोलंदाजाचा समावेश आहे. 


भारत दौऱ्यासाठी फिरकी विभागावर इंग्लंड संघाने विशेष लक्ष दिलेय. इंग्लंडच्या संघात चार फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. हे चारही गोलंदाज वेगळ्या शैलीचे आहेत. टॉम हार्टली आणि शोएब बशीर या नव्या फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. जॅक लीच याचा बॅकअप म्हणून हार्टले याची निवड करण्यात आली आहे. रेहान अहमद याने संघात कमबॅक केलेय.  रेहान डाव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. 


हार्टले आणि बशीर एकही कसोटी खेळले नाहीत - 
 
हार्टले आणि बशीर या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत एकाही कसोटी सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले नाही. हार्टलेने इंग्लंडसाठी दोन वनडे सामने खेळले आहेत. त्याने लंकाशायरसाठी प्रथम श्रेणीचे 20 सामने खेळलेत, त्यामध्ये 40 विकेट घेतल्या आहेत. तर 20 वर्षीय बशीर याने 2023 मध्ये समरसेटसाठी प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केलेय. त्याने सहा सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. हार्टले आणि बशीर हे दोन्ही खेळाडू इंग्लंडच्या लायन्स संघाचा भाग होते, जे गेल्या काही महिन्यापासून संयुक्त अरब अमीरातमध्ये ट्रेनिंग घेत होते. आता दोन्ही खेळाडूंना पहिल्यांदाच कसोटी सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे.  


चार वेगवान गोलंदाजांचा भरणा - 


इंग्लंडच्या संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये अनुभवी जेम्स अँडरसन, मार्क वूड, ओली रॉबिन्सन आणि एटकिंसन यांचा समावेश आहे. अॅशेस खेळणाऱ्या ख्रिस वोक्स याला डावलण्यात आलेय. कर्णधार बेन स्टोक्स गोलंदाजी करणार का? याबाबत सपेन्स आहे. गेल्या महिन्यात स्टोक्सची सर्जरी झाली आहे. इंग्लंडच्या संघात जॉनी बेअयरस्टो आणि बेन फॉक्स यांच्या रुपाने दोन विकेटकिपर आहेत. 


भारताविरोधात इंग्लंडचा कसोटी संघ - 


 बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिंसन, जो रूट आणि मार्क वूड 


कसोटी मालिकेचं वेळापत्रक - 


इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये 25 जानेवारीपासून होणार आहे. दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखपट्टणम येथे होणार आहे. राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. रांचीमध्ये 23 फेब्रुवारीपासून चौथा कसोटी सामना होणार आहे. अखेरचा कसोटी सामना धरमशाला मैदानावर सात मार्चपासून होणार आहे.