England Lose 12 WTC Points For Slow Over-Rate vs New Zealand : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट संघाच्या अडचणीत आणखी मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंड संघावर कडक कारवाई केली असून, त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) गुणांमधून थेट 12 गुण वजा केले आहेत. या कारवाईमुळे इंग्लंडचे डब्लूटीसी फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न आता जवळपास संपुष्टात आले आहे.

Continues below advertisement

मॅच फीमध्ये 50 टक्क्यांची कपात (England vs New Zealand 2nd Test) 

लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 253 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर आयसीसीचे मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांनी तपासणीअंती स्पष्ट केले की, इंग्लंडचा संघ निर्धारित वेळेपेक्षा 12 षटके मागे होता. आयसीसीच्या नियमांनुसार, संघ जेवढी षटके कमी टाकतो, त्यानुसार शिक्षा दिली जाते. प्रत्येक एका षटकासाठी खेळाडूंच्या मॅच फीमधून 5 टक्के दंड आकारला जातो, जो जास्तीत जास्त 50 टक्क्यांपर्यंत असू शकतो. इंग्लंड संघ 12 षटके मागे असल्याने सर्व खेळाडूंवर जास्तीत जास्त 50 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Continues below advertisement

डब्लूटीसी गुणतालिकेत मोठे नुकसान (England Lose 12 WTC Points)

आयसीसीच्या नियमांनुसार, कसोटी चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक एका कमी षटकासाठी संघाचा एक गुण कापला जातो. याच आधारे इंग्लंडचे 12 गुण कापण्यात आले आहेत. फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा असताना, या मोठ्या दंडाने इंग्लंडला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे.

जो रूटने मानली चूक

इंग्लंडचा काळजीवाहू कर्णधार जो रूट याने आपली चूक मान्य करत आयसीसीने दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणावर कोणतीही औपचारिक सुनावणी घेण्याची गरज पडली नाही. मैदानी पंच नितीन मेनन, एड्रियन होल्डस्टॉक, तिसरे पंच रॉड टकर आणि चौथे पंच ग्रॅहम लॉयड यांनी इंग्लंडवर हे आरोप लावले होते.

तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडला दिलासा

एकीकडे या कारवाईमुळे इंग्लंडचे मोठे नुकसान झाले असले, तरी तिसऱ्या निर्णायक कसोटी सामन्यापूर्वी संघासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सन यांचे संघात पुनरागमन झाले आहे. लॉर्ड्स कसोटीनंतर एका नाईट क्लबमधील वादात अडकल्यामुळे या दोघांना दुसऱ्या कसोटीतून बाहेर ठेवण्यात आले होते. मात्र, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) तपासणीनंतर आता या दोघांनाही खेळण्याची मंजुरी देण्यात आली आहे.

हे ही वाचा -

Vaibhav Sooryavanshi Next Match : श्रीलंकेचा धुव्वा उडवणारा वैभव सूर्यवंशी आता थेट इंटरनॅशनल खेळणार; पुढची मॅच कधी अन् कुठे?, जाणून घ्या A टू Z