Pakistan Semi Final Scenario : न्यूझीलंडने आज श्रीलंकेचा पाच विकेट्सने पराभव करत सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित केलेय. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचा रनरेट अतिशय खराब आहे. त्याशिवाय त्यांचे उर्वरित सामनेही तगड्या संघासोबत आहेत. त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचे विश्वचषकातील आव्हान आता जवळपास संपुष्टात आलेय. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना आता जवळपास निश्चित झालाय. अफगाणिस्तानपेक्षा पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहचण्याची संधी जास्त आहे. पण अशक्यप्राय अशा फरकाने त्यांना सामना जिंकावा लागणार आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर पाकिस्तानसासाठीचं समीकरण समोर आलेय. पाकिस्तानला इंग्लंडविरोधात अतिशय मोठा विजय मिळवावा लागणार आहे. पाहूयात पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे गणित काय आहे.. 


इंग्लंडची प्रथम फलंदाजी असल्यास - 


शनिवारी इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी केल्यास पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल. समजा इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 300 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानला हे आव्हान फक्त सहा षटकात पार करावे लागेल. तेव्हाच त्यांचा रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होईल. त्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टातच आलेय. 


पाकिस्तानची प्रथम फलंदाजी आल्यास -


पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्थान पटकावण्यासाठी इंग्लंडचा 275 पेक्षा जास्त धावांनी पराभव करावा लागेल. पाकिस्तान संघाची प्रथम फलंदाजी आल्यास त्यांना 400 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारावा लागेल. त्यानंतर इंग्लंड संघाला 125 पेक्षा कमी धावसंख्येत गुंडाळावे लागेल.










न्यूझीलंडचा लंकेवर पाच विकेट्सने विजय


न्यूझीलंडनं श्रीलंकेचा पाच विकेट्स आणि तब्बल १६० चेंडू राखून पराभव करून विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आपला पहिला दावा सांगितला. विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथं स्थान पटकावून उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन संघांत मोठी चुरस आहे. न्यूझीलंडनं श्रीलंकेवर मोठ्या फरकानं विजय मिळवून आपला नेट रनरेट आणखी उंचावला आहे. त्यामुळं पाकिस्तानला अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडवर आणखी मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे. दरम्यान, बंगळुरूतल्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा अख्खा डाव १७१ धावांत गुंडाळून निम्मी लढाई जिंकली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टनं तीन, तर लॉकी फर्ग्युसन, मिचेल सॅन्टनर आणि रचिन रवींद्रनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेनं ४५, रचिन रवींद्रनं ४२ आणि डॅरिल मिचेलनं ४३ धावांची खेळी करून आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.