INDIA VS England Test Series : टीम इंडिया पुन्हा एकदा परदेशी भूमीवर मोठ्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. यावेळी टीम इंडियाचा सामना इंग्लंड संघाशी (India Tour of England 2025) होणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी संघातून निवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच 20 जून रोजी त्यांच्याशिवाय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या दौऱ्याचे महत्त्वही वाढले आहे कारण या दोघांच्या अनुपस्थितीत संघाची कमान युवा फलंदाज शुभमन गिलकडे (Shubman Gill) सोपवण्यात आली आहे. तर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी (India vs England Test Series 2025) 5 जून रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली होती, ज्यामध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान, गौतम गंभीर म्हणाला, "इंग्लंडमध्ये 1000 धावा केल्यानंतरही विजयाची हमी नाही." गंभीरच्या विधानाचा अर्थ काय? आणि गौतम गंभीरच्या डोक्यात कोणता मास्टर प्लॅन आहे, हे समजून घेऊ...
इंग्लंडमध्ये फक्त मैदानच नाही तर...
गौतम गंभीर म्हणाला की इंग्लंडमध्ये खेळताना फक्त मैदानच नाही तर ढगाळ वातावरण पण खूप महत्त्वाचे असते. तो म्हणाला, "इंग्लंडमध्ये ढग आणि वारा नेहमीच सामना मार्ग बदलू शकते. त्यामुळे तुम्ही हजार धावा केल्या तरी तुमच्या विजयाची हमी देता येत नाही. सामना आणि मालिका जिंकण्यासाठी 20 विकेट्स घेणे आवश्यक आहे. जर आपण हे करण्यात यशस्वी झालो तर आपल्याला नक्कीच यश मिळेल."
यावेळी गंभीरने जसप्रीत बुमराहबद्दलही मोठे विधान केले. गंभीरला विचारण्यात आले की, बुमराह इंग्लंडविरुद्ध किती कसोटी सामने खेळेल. यावर गंभीर म्हणाला की, "आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही की बुमराह कोणते कसोटी सामने खेळेल. ते सामन्यांच्या निकालावरही अवलंबून असेल."
कर्णधार म्हणून गिलची पहिली मोठी परीक्षा
या पत्रकार परिषदेदरम्यान शुभमन गिलने त्याच्या कर्णधारपदाबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, संघाची तयारी चांगली आहे आणि या संधीतून त्याला बरेच काही शिकायला मिळेल. यावेळी शुभमन गिलची बीसीसीआयने भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवड केली. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे आणि ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी परीक्षा देखील असेल.
टीम इंडिया 6 जूनच्या रात्रीपर्यंत इंग्लंडला रवाना झाली. आता युवा कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली विराट-रोहितशिवाय भारतीय संघ कोणती रणनीती आखतो आणि परदेशी भूमीवर नवीन संघासह भारत कसोटी जिंकू शकतो का हे पाहणे बाकी आहे.