मुंबई, 6 जून 2025 : 20 जूनपासून भारत आणि इंग्लंड (India vs England Test Series 2025) यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर खेळवण्यात येणारी कसोटी मालिका पूर्वी पतौडी ट्रॉफी (Pataudi Trophy) म्हणून ओळखली जात होती, ज्याचे नाव आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मार्चमध्ये ईसीबीने पतौडी कुटुंबाला एक पत्र लिहून कळवले की या ट्रॉफीचे नाव बदलणारआहे. त्याच वेळी, आता भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेलाही एक नवीन नाव देण्यात आले आहे. जे जागतिक क्रिकेटमधील दोन महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन (Tendulkar-Anderson Trophy) यांच्या नावावर आहे.
तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी नामांतर
सचिन तेंडुलकरने दीर्घकाळ जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले आहे, तर जेम्स अँडरसनने वेगवान गोलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. बीबीसी स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मालिका आता तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणून ओळखली जाईल, ज्याचा पहिला सामना 20 जून रोजी हेडिंग्ले मैदानावर (Headingley Cricket Ground) होणार आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी ईसीबीकडून ट्रॉफीचे नवीन नाव अधिकृतपणे जाहीर केले जाईल.
गावसकर यांनी व्यक्त केली नाराजी
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ECB) या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या स्पोर्टस्टार कॉलममध्ये लिहिले आहे की, "अलीकडेच अशी बातमी आली आहे की ECB इंग्लंड आणि भारत यांच्यात इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील विजेत्यांना दिलेली पतौडी ट्रॉफीचे नाव बदलले, ही खरोखरच त्रास देणारी बातमी आहे. वैयक्तिक खेळाडूंच्या नावावर असलेली ट्रॉफी काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे, जरी हा पूर्णपणे ECB चा निर्णय आहे आणि BCCI ला याबद्दल माहिती देण्यात आली असेल. यावरून इंग्लंड आणि भारतातील क्रिकेटमध्ये पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता दिसून येते."
अँडरसनने सचिनला कसोटीत सर्वाधिक वेळा केले आऊट
सचिन तेंडुलकरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत जेम्स अँडरसनविरुद्ध एकूण 14 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये जेम्स अँडरसनने सचिनला त्याच्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक वेळा म्हणजेच 9 वेळा आऊट केले आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसनकडून एकूण 350 चेंडूंचा सामना केला आहे, ज्यामध्ये तो 23.11 च्या सरासरीने 208 धावा करू शकला. सचिनने 260 डॉट बॉलचा सामना करताना अँडरसनच्या चेंडूंवर 34 चौकार मारले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत सचिन अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे, त्याच्या नावावर एकूण 15921 धावा आहेत, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत जेम्स अँडरसन तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 704 विकेट घेतले.