DY Patil Passes Away : देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन झाले. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि समाजकारणातील एक महामेरू हरपला आहे, पण त्यांनी उभारलेली उत्तुंग कार्ये कायम त्यांची आठवण करून देत राहतील. नवी मुंबईतील नेरूळ येथे उभारलेले डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्या याच दूरदृष्टीचे एक प्रतीक मानले जाते.
डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियम... नवी मुंबईची ओळख बनलेले हे मैदान आज भारतातील सर्वात आधुनिक क्रिकेट स्टेडियमपैकी एक मानले जाते. आयपीएलपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट, महिला क्रिकेट, फुटबॉल, संगीत मैफिली आणि मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत अनेक ऐतिहासिक क्षणांचे हे साक्षीदार ठरले आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वप्न (DY Patil Cricket Stadium Navi Mumbai Story)
या स्टेडियमची स्थापना मार्च 2008 मध्ये झाली. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या जागतिक दर्जाच्या स्टेडियमची निर्मिती करण्यात आली. प्रसिद्ध आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी या स्टेडियमची रचना केली आहे. सुमारे 55,000 प्रेक्षकक्षमतेचे हे स्टेडियम प्रेक्षकांच्या सोयी-सुविधांच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम स्टेडियम्सपैकी एक मानले जाते. 2008 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामना येथे खेळवण्यात आला आणि त्यानंतर हे मैदान भारतीय क्रिकेटच्या नकाशावर ठळकपणे झळकू लागले.
आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा साक्षीदार (DY Patil Cricket Stadium Story)
उद्घाटनानंतर अवघ्या काही महिन्यांतच या स्टेडियमने इतिहास रचला. इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्यावहिल्या मोसमाचा अंतिम सामना याच मैदानावर खेळवला गेला, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला होता. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील (आंतरराष्ट्रीय सामने, महिला क्रिकेट आणि आयपीएल) अनेक रोमांचक सामने या मैदानावर यशस्वीरीत्या पार पडले आहेत.
हे स्टेडियम फक्त क्रिकेटपुरते मर्यादित न राहता जागतिक क्रीडा जगताचे केंद्र बनले. फुटबॉल जगतातील अत्यंत महत्त्वाची फीफा अंडर-17 वर्ल्ड कप स्पर्धा या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केलेल्या या मैदानाने फुटबॉल रसिकांचीही मने जिंकली. जस्टिन बीबर सारख्या आंतरराष्ट्रीय पॉप स्टार्सच्या जगप्रसिद्ध कॉन्सर्ट्स आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही या स्टेडियमवर झाले आहे.
2025 च्या महिला वर्ल्ड कपमधील 'ऐतिहासिक' क्षण (ICC Women's ODI World Cup final DY Patil Cricket Stadium)
डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या इतिहासात 2025 चा महिला वनडे वर्ल्ड कप सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. याच मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत पहिलावहिला ऐतिहासिक महिला वनडे वर्ल्ड कप जिंकला. भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा साक्षीदार बनून या स्टेडियमने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव सदैव अमर केले आहे. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने आज संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे. मात्र, त्यांनी नेरूळच्या मातीत उभारलेले हे आंतरराष्ट्रीय क्रीडांगण येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
हे ही वाचा -
