Broadcaster Asked For Discount From ICC : टी-20 वर्ल्ड कप 2024 हा भारतीय संघासाठी एकदम भारी राहिला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 29 जून रोजी बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या संस्मरणीय फायनलमध्ये विजय मिळवत भारतीय संघाने 11 वर्षांपासून सुरू असलेला विजेतेपदाचा दुष्काळही संपवला.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेला हा वर्ल्ड कप भारतीय चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरला, पण सर्वांना त्याचा फायदा झाला नाही. आता एक अपील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपर्यंत पोहोचले आहे, ज्यामध्ये 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 830 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि याबद्दल बोलले गेले आहे.
टी-20 वर्ल्ड कप 2024 ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्ससाठी अजिबात चांगला राहिला नव्हता. आयसीसी आणि स्टार यांच्यातील 3 अब्ज डॉलरचा करार अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपपासून लागू झाला होता. ‘क्रिकबझ’ च्या एका अहवालानुसार, स्टार स्पोर्ट्स विविध कारणांमुळे स्पर्धेच्या एकूण मूल्यांकनावर सूट देण्याची मागणी करत आहे.
अहवालानुसार, स्टारने आयसीसीला दोन पत्रे लिहिली आणि गेल्या महिन्यात कोलंबो येथे झालेल्या वार्षिक परिषदेत या मुद्द्यावर चर्चा केली. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनीही या प्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, अंतिम निर्णय बोर्डावर अवलंबून असेल.
830 कोटींची सूट देण्याची मागणी
विविध कारणांमुळे स्टार वर्ल्ड कपमध्ये 100 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 830 कोटी रुपये) पेक्षा जास्त डिस्काउंटची मागणी करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही सूट देण्याची मागणी करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे फ्लोरिडामध्ये भारत आणि कॅनडा यांच्यातील रद्द झालेला सामना असल्याचे सांगितले जात आहे.
भारत-कॅनडा व्यतिरिक्त, इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, अमेरिका विरुद्ध आयर्लंड आणि श्रीलंका विरुद्ध नेपाळ यासारखे काही सामने देखील रद्द करण्यात आले. त्यामुळे आता स्टार आयसीसीला कितपत पटवून देण्यात यशस्वी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एवढेच नाही तर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लो स्कोअरिंग सेमीफायनलवरही चिंता व्यक्त केली, जिथे अफगाणिस्तान 56 धावांवर ऑलआऊट झाला आणि त्यानंतर अवघ्या 9 षटकात लक्ष्य गाठून आफ्रिकेने विजय मिळवला.