Riyan Parag Scold Vaibhav Sooryavanshi Video : आयपीएलच्या 19व्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सचे जेतेपदाचे स्वप्न भंगले आहे. गुजरात टायटन्सने राजस्थानचा 7 गडी राखून पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत (RCB) होईल. मात्र, या मोठ्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार रियान पराग मैदानावरील त्याच्या एका वर्तनामुळे चांगलाच ट्रोल होत आहे.

वैभव सूर्यवंशीवर भडकला रियान पराग (Riyan Parag Scold Vaibhav Sooryavanshi Video)

या सामन्यात राजस्थानकडून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने अवघ्या 47 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 96 धावांची वादळी खेळी केली. दुर्दैवाने तो सलग दुसऱ्या सामन्यात 'नर्वस नाइंटीज'चा (90 धावांच्या घरात बाद होणे) बळी ठरला. वैभव बाद होऊन जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा कर्णधार रियान पराग त्याला भर मैदानात रागावताना आणि डांटताना दिसला.

सोशल मीडियावर याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पराग त्याला 'अशा पद्धतीने बाद व्हायला नको होते' असे सांगताना दिसत आहे, तर बिचारा वैभव मान खाली घालून त्याचे बोलणे ऐकत आहे. चाहत्यांना परागची ही पद्धत अजिबात आवडलेली नाही. कारण, या महत्त्वाच्या सामन्यात रियान पराग स्वतः फ्लॉप ठरला. त्याने अवघ्या 11 धावा (6 चेंडू) केल्या. स्वतः काहीही न करता, संघासाठी सर्वोत्तम खेळी करणाऱ्या 19 वर्षांच्या खेळाडूवर राग काढल्यामुळे परागवर टीका होत आहे.

गुजरातचा शानदार विजय (Gujarat Titans vs Rajasthan Royals Qualifier 2 IPL 2026)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने वैभवच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 214 धावांचा डोंगरासारखा स्कोअर उभा केला होता. 215 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या सलामीवीरांनी राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. कर्णधार शुभमन गिलने अवघ्या 53 चेंडूत 104 धावांचे शानदार शतक ठोकले, तर साई सुदर्शनने 58 धावांची खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी करत गुजरातचा विजय सुकर केला.

परागने मानली चूक (Riyan Parag Reflects on Defeat Against Gujarat Titans)

सामन्यानंतर बोलताना कर्णधार रियान परागने पराभवाचे खापर काही महत्त्वाच्या चुकांवर फोडले. "“पहिल्या डावात खेळपट्टीवर गोलंदाजांना चांगली मदत मिळत होती. चेंडूला ग्रिप मिळत होती. मात्र दुसऱ्या डावात जड रोलरमुळे फलंदाजीसाठी परिस्थिती अधिक चांगली झाली. मला वाटतं 240 धावांच्या आसपासचा स्कोअर असता, तर गुजरातसाठी आव्हान खूप मोठं ठरलं असतं.” त्याने पुढे सांगितले की, संघाला सलामीवीरांकडून अपेक्षित योगदान मिळाले नाही. त्यामुळे मधल्या फळीवर अतिरिक्त दबाव आला आणि राजस्थानला अपेक्षेपेक्षा कमी धावसंख्येवर समाधान मानावे लागले, अशी कबुली परागने दिली. 

हे ही वाचा -

गुजरातविरुद्ध 'ती' एक चूक अन् सामना हातातून निसटला; रियान परागने त्यांच्यावर खापर फोडून हात वर केले, नेमकं काय काय म्हणाला?