Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीचं वादळ रोखण्यासाठी कर्णधार तिलकने लावली तगडी फिल्डिंग, खतरनाक गोलंदाजीची थेट टीममध्ये एन्ट्री; तर पडिक्कलचीही निवड
South Zone vs North Zone Duleep Trophy Final : दुलीप ट्रॉफी 2026 च्या अंतिम सामन्याला आता अवघे काही दिवस उरले असून साऊथ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

South Zone vs North Zone Duleep Trophy Final : दुलीप ट्रॉफी 2026 च्या अंतिम सामन्याला आता अवघे काही दिवस उरले असून, रविवारी 6 सप्टेंबरपासून साऊथ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या ताफ्यातील काही मोठ्या नावांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ईस्ट झोनचा उपकर्णधार वैभव सूर्यवंशी सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ईस्ट झोनने उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे अंतिम सामन्यात वैभव खेळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, साऊथ झोनने उपांत्य फेरीत नॉर्थ झोनचा 7 विकेट्सनी पराभव केला. या विजयात कर्णधार तिलक वर्माचा मोठा वाटा होता. तिलकने नाबाद 116 आणि 51 धावांच्या खेळी करत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले.
तिलक, वैभव आणि ईशानच्या खेळण्याची शक्यता
तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी आणि ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशन या तिघांचाही आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश आहे. ही मालिका 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वी तिन्ही खेळाडू दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळणार नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता तिघेही फायनलमध्ये मैदानात उतरण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाकडून अखेरच्या क्षणी त्यांना विश्रांती देण्याची विनंती झाली नाही, तर ते दलीप ट्रॉफी फायनल खेळू शकतात.
तिलक वर्माने स्वतः फायनल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उपांत्य फेरीतील शानदार कामगिरीनंतर बोलताना त्याने दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना खेळण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट केले होते. अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी-20 सामना 13 सप्टेंबरला असल्याने फायनलनंतर त्याला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो, असेही त्याने सांगितले होते.
पडिक्कल-सिराजच्या एन्ट्रीने साऊथ झोनची ताकद वाढली
दरम्यान, साऊथ झोनच्या संघात दोन मोठ्या खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, हे दोघे कोणत्या खेळाडूंची जागा घेणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पडिक्कलने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. दोन कसोटी सामन्यांमध्ये तीन डावांत 328 धावा करत त्याने प्लेअर ऑफ द सीरीजचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये त्याच्या उपस्थितीमुळे साऊथ झोनच्या फलंदाजीला मोठी ताकद मिळणार आहे.
हे ही वाचा -




















