Abishek Porel News : दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये खेळणारा विकेटकीपर-फलंदाज अभिषेक पोरेल याला मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर तब्बल 36 दिवस तुरुंगात असलेल्या पोरेलला न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनंतर पोरेलविरोधात हे प्रकरण दाखल करण्यात आलं होतं.
नेमकं काय काय घडलं?, धक्कादायक माहिती समोर
तक्रारदार तरुणीने अभिषेक पोरेलसोबत जवळपास साडेतीन वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता. पोरेलने आपल्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप तरुणीने केला. तक्रारदार तरुणीच्या म्हणण्यानुसार, या कालावधीत ती पोरेलसोबत परदेशातही गेली होती. लग्नाच्या आश्वासनानंतर नंतर परिस्थिती बदलल्याने तिने पोलिसांत धाव घेतल्याचं सांगितलं जात आहे.
23 जूनला पोलिसांत तक्रार
या प्रकरणात 23 जून 2026 रोजी मोगरा पोलीस ठाण्यात अभिषेक पोरेलविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर भारतीय न्याय संहितेतील कलम 69, 311 आणि 318, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66 आणि 72 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. कलकत्ता उच्च न्यायालयाने पोरेलला अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर तक्रारदाराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून व्हायरल होण्याची शक्यता लक्षात घेऊन क्रिकेटपटूची इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
11 ऑगस्टला अटक
न्यायालयाच्या निर्देशांनंतर अभिषेक पोरेलला 11 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो 36 दिवस तुरुंगात होता. आता न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्याला तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत असून, अभिषेक पोरेलवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.
कोण आहे अभिषेक पोरेल?
23 वर्षीय अभिषेक पोरेल हा विकेटकीपर-फलंदाज असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. त्याने आतापर्यंत 32 प्रथम श्रेणी सामन्यांमधील 50 डावांत 1,408 धावा केल्या आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 21 डावांत त्याच्या नावावर 833 धावा आहेत, तर टी-20 क्रिकेटमध्ये 59 डावांत त्याने 1,590 धावा केल्या आहेत. पोरेलने 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल पदार्पण केलं होतं. 2026 च्या हंगामापर्यंत तो दिल्ली कॅपिटल्सचाच भाग होता. आयपीएलमधील 35 सामन्यांच्या 33 डावांत त्याने 769 धावा आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत.
हे ही वाचा -
