Delhi Capitals vs Rajasthan Royals IPL 2026 : धुरंधर गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) घेतलेले 4 बळी आणि त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये अक्षर पटेल व इम्पॅक्ट प्लेयर आशुतोष शर्मा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 5 विकेट्सनी पराभव केला. दिल्लीच्या या घरच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यातील विजयामुळे त्यांच्या प्ले-ऑफच्या (Play-offs) आशा आता कायम राहिल्या आहेत.
IPL Points Table: गुणतालिकेत मोठी उलथापालथ
या महत्त्वाच्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्स 13 सामन्यांत 12 गुणांसह सातव्या स्थानावर पोहोचली आहे. दुसरीकडे, पराभवामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ 12 सामन्यांत 12 गुणांसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. चेन्नई सुपर किंग्जचेही 12 सामन्यांत 12 गुण आहेत, परंतु चांगल्या रनरेटमुळे तो पाचव्या स्थानावर कायम आहे.
Ashutosh Sharma: आशुतोष शर्माची मॅच फिनिशिंग खेळी
राजस्थानने दिलेल्या 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला शेवटच्या दोन षटकांत 19 धावांची गरज होती. आशुतोष शर्माने 19 व्या षटकात बृजेश शर्माला एक गगनभेदी षटकार ठोकला. त्यानंतर 10 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर एडमिल्नेला एक चौकार आणि एक षटकार मारून दिल्लीला शानदार विजय मिळवून दिला. अक्षर पटेल 34 धावांवर (18 चेंडू) तर आशुतोष शर्मा 18 धावांवर (5 चेंडू) नाबाद राहिला.
KL Rahul and Abishek Porel: राहुल आणि पोरेलची दमदार सुरुवात
दिल्लीची सुरुवात अत्यंत मजबूत झाली. अभिषेक पोरेल (30 चेंडूंत 50 धावा) आणि केएल राहुल (42 चेंडूंत 56 धावा) या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 60 चेंडूंत 105 धावांची भागीदारी केली. या डावात राजस्थानचे क्षेत्ररक्षण अतिशय सुमार दर्जाचे राहिले; त्यांनी झेल सोडले आणि ओव्हरथ्रोच्या रूपात अनेक धावा बहाल केल्या.
Mitchell Starc: स्टार्कने घेतले 40 धावांत 4 बळी
यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची स्थिती 14 षटकांपर्यंत 2 बाद 160 अशी भक्कम होती. राजस्थान सहज 230 धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते. मात्र, 15 व्या षटकात मिचेल स्टार्कने चमत्कार केला. त्याने आक्रमक खेळणाऱ्या राजस्थानचा कर्णधार रियान पराग (51 धावा) आणि डोनोवन फरेरा (0) यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. याच षटकात रवी सिंग (4) देखील आऊट झाला. स्टार्कच्या या धक्क्यामुळे राजस्थानला शेवटच्या 6 षटकांत केवळ 33 धावा करता आल्या आणि त्यांनी 6 विकेट्स गमावल्या. राजस्थानचा डाव 8 बाद 193 धावांवर मर्यादित राहिला. स्टार्कने 40 धावांत 4 बळी घेतले, तर लुंगी एंगिडी आणि माधव तिवारी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, राजस्थानकडून कर्णधार रियान परागच्या 51 धावांव्यतिरिक्त वैभव सूर्यवंशीने अवघ्या 21 चेंडूंत 46 धावांची (5 चौकार, 3 षटकार) खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. त्याने जागतिक दर्जाचा गोलंदाज स्टार्कला सहजतेने षटकार ठोकले. तसेच ध्रुव जुरेलने 49 चेंडूंत 53 धावांचे उपयुक्त योगदान दिले. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे राजस्थानला मोठा स्कोर उभा करता आला नाही.
आणखी वाचा
