Ben Stokes Fight Video : इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर झालेल्या सेलिब्रेशनदरम्यान नाइटक्लबबाहेर झालेल्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्टोक्स आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन काही व्यक्तींशी रस्त्यावर वाद घालताना दिसत आहेत.

Continues below advertisement

नेमकं काय घडलं? (Ben Stokes Fight Video)

माध्यमांतील वृत्तांनुसार, रविवारी उशिरा रात्री हा प्रकार घडला. काही तासांपूर्वीच इंग्लंडने लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंडचा 115 धावांनी पराभव करून मालिकेत दमदार सुरुवात केली होती. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खेळाडू नाइटक्लबमध्ये गेले होते. मात्र, त्यानंतर क्लबबाहेर स्टोक्स, अ‍ॅटकिन्सन आणि एका रग्बी खेळाडूसह त्याच्या साथीदारामध्ये जोरदार वाद झाल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही बाजूंमध्ये आधी बाचाबाची नंतर धक्काबुक्की आणि हाणामारी झाल्याचे दिसते. एक व्यक्ती जमिनीवर पडल्याचे दिसून आले. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

Continues below advertisement

ECB ची चौकशी सुरू (England cricket Ben Stokes Fight Video)

या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने अधिकृत चौकशी सुरू केली आहे. बोर्डाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर संघाच्या शिस्तभंगाशी संबंधित नियमांचे उल्लंघन झाले का, याचा तपास केला जात आहे. ECB ने सांगितले की, स्टोक्स आणि अ‍ॅटकिन्सन सोमवारी पहाटे त्या नाइटक्लबमध्ये उपस्थित होते जिथे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची अधिक माहिती गोळा केली जात असून योग्य वेळी पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच ही बाब क्रिकेट रेग्युलेटरकडेही सोपवण्यात आली आहे.

कर्णधारपदावर परिणाम होणार?

घटनेनंतर काही इंग्लिश माध्यमांमध्ये स्टोक्सच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. काही अहवालांमध्ये त्यांच्या संभाव्य निवृत्तीबाबतही तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, ECB कडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन मात्र स्टोक्सच्या बाजूने उभा राहिला आहे. एका मुलाखतीत बोलताना हार्मिसन म्हणाला की, संपूर्ण सत्य समोर येण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य ठरणार नाही.

त्याने म्हटले, "बेन स्टोक्स हा उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. संपूर्ण माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणावर मत व्यक्त केले पाहिजे. जर त्यांच्याकडून काही चूक झाली असेल, तर त्यांनाही त्याची जाणीव होईल आणि ते योग्य निर्णय घेतील." हार्मिसन पुढे म्हणाला की, "मी बेनला अनेक वर्षांपासून ओळखतो. परिस्थितीनुसार योग्य पाऊल उचलण्याची क्षमता त्याच्यात आहे."

व्हायरल व्हिडिओमुळे इंग्लंड क्रिकेटमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. ECB च्या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि त्यानंतर स्टोक्स व अ‍ॅटकिन्सनवर कोणती कारवाई होते, याकडे आता क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. इंग्लंडच्या आगामी मालिकांपूर्वी हा वाद संघासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.

हे ही वाचा -  

IND A vs SL A Highlights : टीम इंडियाने श्रीलंकेच्या हातातील विजय हिसकावला; शेवटच्या 4 षटकांमध्ये सामना फिरवला