BCCI Umpire Hit By Ball On Face : दिल्ली प्रीमियर लीग (DPL 2026) स्पर्धेत एक धक्कादायक घटना घडली आहे. ईस्ट दिल्ली रायडर्स आणि न्यू दिल्ली टायगर्स यांच्यातील सामन्यादरम्यान अंपायर धर्मेश भारद्वाज यांच्या चेहऱ्यावर वेगाने आलेला चेंडू आदळला. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ICUमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

नेमकं मैदानात काय घडलं?

न्यू दिल्ली टायगर्सच्या डावातील 18व्या षटकात ही धक्कादायक घटना घडली. स्पिनर मीना गोलंदाजी करत असताना फलंदाजाने सरळ दिशेने जोरदार फटका मारला. चेंडू अत्यंत वेगाने अंपायर धर्मेश भारद्वाज यांच्या दिशेने गेला. अंपायरने चेंडूपासून वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूचा वेग इतका जास्त होता की त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. अखेर चेंडू थेट त्यांच्या चेहऱ्यावर जाऊन आदळला. चेंडू लागताच मैदानातील वातावरण काही क्षणांसाठी स्तब्ध झालं. फलंदाजानेही लगेच डोकं धरून चिंता व्यक्त केली. त्याला आपल्या फटक्यामुळे अंपायरला दुखापत झाल्याचं प्रचंड वाईट वाटल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Continues below advertisement

अंपायरला दुसऱ्यांदा लागला चेंडू

विशेष म्हणजे, कॉमेंट्रीदरम्यान धर्मेश भारद्वाज यांना याच सामन्यात दुसऱ्यांदा चेंडू लागल्याची माहिती देण्यात आली. यावेळी मात्र चेंडू थेट त्यांच्या चेहऱ्यावर आदळल्याने दुखापत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांना ICUमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दिल्ली प्रीमियर लीगकडून अंपायर धर्मेश भारद्वाज यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

ईस्ट दिल्ली रायडर्सचा 36 धावांनी विजय

दरम्यान, या सामन्यात ईस्ट दिल्ली रायडर्सने न्यू दिल्ली टायगर्सचा 36 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ईस्ट दिल्ली रायडर्सने 20 षटकांत 7 विकेट गमावत 192 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यू दिल्ली टायगर्सचा डाव 19.2 षटकांत अवघ्या 156 धावांवर आटोपला. त्यामुळे ईस्ट दिल्ली रायडर्सने 36 धावांनी सामना जिंकला.

या विजयासह ईस्ट दिल्ली रायडर्सने सलग सहा पराभवांची मालिका अखेर थांबवली. संघाचा यापूर्वीचा एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. आता सात सामन्यांमध्ये संघाच्या खात्यात एका विजयासह तीन गुण जमा झाले आहेत. मात्र गुणतालिकेतील स्थिती पाहता ईस्ट दिल्ली रायडर्ससाठी पुढील वाटचाल अजूनही कठीण आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाला उर्वरित सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.

हे ही वाचा -

Nitish Rana Emotional DPL VIDEO : 27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO