BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
BCCI : ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघाविरोधातील वनडे आणि मल्टी-डे मालिकेसाठी भारताच्या संघात निवड झालेल्या युवा खेळाडूवर बीसीसीआयनं बंदी घातली आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयनं टीम इंडियाचा युवा खेळाडू रोहित यादव याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. रोहित यादवची ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 टीम विरोधातील वनडे आणि मल्टी-डे मालिकेसाठी निवड झाली होती. ज्युनिअर राष्ट्रीय टीममध्ये निवड झाल्यानंतर काही काळातच बीसीसीआयनं रोहित यादववर 2 वर्षांची बंदी घातली आहे. स्पोर्ट स्टारनं सूत्रांच्या माध्यमातून याला दुजोरा दिला आहे. रिपोर्टनुसार रोहित यादव यानं अनेकदा जन्मतारखेमध्ये बदल केला होता.
रोहित यादव श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या अंडर-19 संघाचा सदस्य म्हणून गेला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अंडर-19 टीम विरोधातील एकदिवसीय आणि मल्टी डे मालिकेसाठी रोहित यादवची निवड झाली होती. ही मालिका या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार होती. रोहित यादवच्या चांगल्या करिअरला फसवाफसवीमुळं दोन वर्षांचा ब्रेक लागला आहे.
अनेकदा जन्मतारखेत बदल
रिपोर्टनुसार रोहित यादव यानं 2014 मध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडून नोंदणी केली होती. तेव्हा त्याची जन्मतारीख 7 जुलै 2007 होती आणि त्याचा पत्ता उत्तर प्रदेशमध्ये होता. यानंतर त्याचं आधार कार्ड 2017 मध्ये अपडेट झालं. त्यावेळी त्याचे जन्माचे वर्ष 2006 मध्ये केलं होतं. यानंतर 2020 मध्ये आधार कार्ड अपडेट झालं त्यावेळी त्याचं जन्मवर्ष 2006 होतं, त्यानंतर पुन्हा बदलण्यात आलं. 2021 मध्ये रोहित यादव याचं जन्मवर्ष 2009 करण्यात आलं. यानंतर 2024 पर्यंत झालेल्या अपडेटमध्ये त्याचं जन्मवर्ष 2009 ठेवण्यात आलं, या दरम्यान त्याचा पत्ता बदलण्यात आला. उत्तर प्रदेश ऐवजी त्याचा पत्ता हावडा करण्यात आला.
बीसीसीआयनं या वर्षाच्या सुरुवातीला महत्त्वाचे आदेश दिले होते. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालनं बीसीसआयच्या आदेशानं खेळाडूंच्या वयासंदर्भात चौकशी सुरु केली होती. त्यानंतर रोहित यादव याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. ऑस्ट्रेलिया अंडर-19 टीम विरोधातील मालिकेसाठी भारतीय संघात रोहित यादवची निवड झाली होती. आता त्याच्यावर बंदी घातली गेल्यानं त्याच्या जागी नव्या खेळाडूची निवड लवकरच जाहीर केली जाईल.
रोहित यादवनं युवा खेळाडू म्हणून दमदार कामगिरी केली होती. श्रीलंकेविरोधातील कसोटीत त्यानं 6 विकेट घेतल्या होत्या.




















