Ind vs SA Womens World cup 2025: भारताच्या पोरींनी अशक्य शक्य करुन दाखवलं, पण बीसीसीआयची दानत कमी पडली, गवगवा करुन नंतर शब्द फिरवला?
ICC Womens World Cup 2025: भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला आहे. बीसीसीआयने आधी 125 कोटी देण्याचा विचार बोलून दाखवला नंतर शब्द फिरवला?

Ind vs SA Womens World cup 2025: भारतीय महिला संघाने रविवारी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव करत क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारताच्या महिला संघाने यापूर्वी दोनवेळा अंतिम फेरीत (Ind Vs SA Final) धडक मारली होती. पण त्यांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. मात्र, काल हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाने विश्चचषकाच्या जेतेपदाचा (World cup 2025) हा दुष्काळ संपवला. भारतीय महिलांच्या या कामगिरीमुळे क्रीडा रसिकांची मान अभिमामाने उंचावली. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, यानिमित्ताने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या एका कृतीची सध्या चर्चा रंगली आहे. अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआय महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास 125 कोटी रुपयांचं बक्षीस देईल, अशी चर्चा होती. याबद्दल अधिकृत घोषणा झाली नसली तरी बीसीसीआय भारतीय पुरुष संघाइतकेच म्हणजे 125 कोटी रुपयांचे बक्षीस महिला संघाला मिळेल, अशी हवा निर्माण झाली होती. परंतु, प्रत्यक्षात सामना संपल्यानंतर बीसीसीआय भारतीय महिला संघाला फक्त 51 कोटी रुपयेच देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन आता अनेकजण बीसीसीआयवर टीका करत आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, जर भारतीय महिला क्रिकेट संघाने काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकला, तर बीसीसीआय त्यांना 125 कोटी रुपयांचे मोठे बक्षीस देण्याची तयारी करत असल्याची चर्चा होती. बीसीसीआय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला पुरुष संघाइतकेच बक्षीस देण्याचा मानस असल्याचे म्हटले जात होते. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बीसीसीआय पुरुष आणि महिला खेळाडूंना समान वेतन देण्यावर विश्वास ठेवते. म्हणूनच, जर आमच्या महिला संघाने विश्वचषक जिंकला तर त्यांचे बक्षीस पुरुष संघापेक्षा कमी नसावे, यावर आम्ही चर्चा केली. दरम्यान, जेव्हा भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत टी-20 विश्वचषक जिंकला तेव्हा बीसीसीआयने खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह संपूर्ण संघाला 125 कोटी रुपयांचा मोठा बोनस दिला होता. जर महिला संघाने यावेळी विजेतेपद जिंकले तर त्यांना समान रक्कम म्हणजे 125 कोटी रुपये देणे हे भारतीय महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरले असते. मात्र, बीसीसीआयने महिला भारतीय संघाची अवघ्या 51 कोटी रुपयांमध्ये बोळवण केली.
Ind vs SA Final: भारतीय महिला संघाला नेमके किती पैसे मिळाले?
विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या महिला संघावर आता पैशांचा वर्षाव सुरु झाला आहे. आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर आयसीसीकडून भारतीय महिला संघाला 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनेनूसार 40 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. याशिवाय, बीसीसीआयने महिला संघाला 51 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
ICC Womens World Cup 2025: बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया काय म्हणाले होते?
भारतीय महिला क्रिकेट संघ 2005 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक फायनलमध्ये पोहोचला होता, जेव्हा ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात भारताला हरवून चॅम्पियन बनले होते. 2017 मध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला, जिथे इंग्लंडने विजेतेपद जिंकले. आता, भारत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत आहे. बीसीसीआयच्या सचिवांनी आश्वासन दिले की जर टीम इंडिया जिंकली तर उत्सव भव्य असेल, असे वक्तव्य बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी म्हटले होते. जय शाह यांच्या नेतृत्वाखाली, बीसीसीआयने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत रोडमॅप विकसित केला आहे, ज्यामध्ये महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) सुरू करणे आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी पुरुष आणि महिला खेळाडूंमध्ये वेतन समानता सुनिश्चित करणे समाविष्ट आहे. आमचे उद्दिष्ट नेहमीच महिला क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणे आणि सक्षम करणे हे राहिले आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
आणखी वाचा















