BCCI On Bangladesh T20 World Cup 2026 : मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर त्याचे पडसाद आता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उमटताना दिसत आहेत. या प्रकरणावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून (BCB) मंगळवारी रात्री सुमारे 9.30 वाजता तातडीची बैठक घेतली. या बैठकीत टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारतात होणाऱ्या आपल्या सामन्यांचे वेन्यू बदलून श्रीलंकेत हलवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतात सामने खेळण्याऐवजी श्रीलंकेत सामने आयोजित व्हावेत, अशी बांगलादेश क्रिकेट बोर्डाची ठाम इच्छा असल्याचे समजले. या निर्णयामुळे आगामी टी-20 वर्ल्ड कपभोवतीचा राजकीय आणि क्रीडा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
BCCI कडून या प्रकरणावर प्रतिक्रिया
या घडामोडीनंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) या प्रकरणावर प्रतिक्रिया समोर आली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने स्पष्ट शब्दांत सांगितले की, स्पर्धेला अवघा एक महिना शिल्लक असताना सामने दुसऱ्या देशात हलवणे जवळपास अशक्य आहे. सूत्रांच्या मते, “कोणाच्या मर्जीनुसार किंवा पसंतीनुसार सामने बदलता येत नाहीत. लॉजिस्टिकदृष्ट्या हे अत्यंत कठीण आहे. विरोधी संघांचे विमान तिकिटे, हॉटेल बुकिंग्स आधीच बुक झाली आहेत. अशा परिस्थितीत अचानक बदल करणे शक्य नाही.”
बीसीसीआयच्या सूत्राने पुढे सांगितले की, “स्पर्धेदरम्यान अनेक दिवस तीन-तीन सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी एखादा सामना श्रीलंकेत ठेवणे म्हणजे संपूर्ण शेड्यूल कोलमडण्यासारखे आहे. ब्रॉडकास्ट क्रू, तांत्रिक यंत्रणा आणि इतर व्यवस्था यामुळे हे बोलणे सोपे असले तरी प्रत्यक्षात अमलात आणणे फारच कठीण ठरेल.”
गट टप्प्यात बांगलादेशचे चार सामने कोलकात्यात खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 7 फेब्रुवारी, इटलीविरुद्ध 9 फेब्रुवारी आणि इंग्लंडविरुद्ध 14 फेब्रुवारी हे सामने कोलकात्यात होणार आहेत. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी त्यांचा शेवटचा साखळी सामना मुंबईत नेपाळविरुद्ध होणार आहे. त्यामुळे वेन्यू बदलण्याच्या मागणीवर ICC काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बीसीसीआयच्या निर्देशांनुसार मुस्ताफिजुर रहमानला आयपीएलमधून वगळल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने चिंता व्यक्त केली आहे की, भारतात बांगलादेशच्या खेळाडूंच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. शाहरुख खानची आयपीएल फ्रेंचायजी कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) BCCIच्या आदेशानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला संघातून रिलीज केले. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात अबू धाबी येथे झालेल्या आयपीएल लिलावात जोरदार बोलीनंतर केकेआरने मुस्ताफिजुरला तब्बल 9.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
हे ही वाचा -