नवी दिल्ली : आयपीएलच्या 2026 च्या पर्वातून कोलकाता नाइट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला वगळल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डानं यानंतर सुरक्षेचा मुद्दा पुढं करत टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतात येण्यास नकार देत सामने श्रीलंकेला हलवण्याची मागणी केली. याशिवाय आयपीएलच्या बांगलादेशमधील प्रक्षेपणावर देखील बंदी घातली. हे सर्व एका बाजूला घडत असताना बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंझीम साकिब यानंत मोठं वक्तव्य केलं आहे, तो म्हणाला की, आम्हाला आयपीएलमध्ये खेळायचे आहे आणि क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे.
कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल 2026 साठी मुस्तफिजुर रहमानला 9.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते. बांगलादेशमधील हिंदू तरुणांच्या हत्येच्या विरोधात केकेआर आणि संघाचा मालक शाहरुख खान यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली होती. यानंतर बीसीसीआयच्या आदेशाचं पालन करत केकेआरनं मुस्तफिजूर रहमानला वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व प्रकरणावर बोलताना तंझीम साकिब म्हणाला की, त्याला लीगमध्ये खेळायचे आहे, परंतु आता असे घडल्यानंतर लिलावात आपले नाव देण्यापूर्वी संबंधित लोकांशी विचारविनिमय करावा लागेल.
तंझीम साकिबने काय म्हटले?
तंझीम साकिब यानं इंडियन प्रीमियर लीगच्या 2026 च्या पर्वासाठी लिलावात नाव दिलं होतं. मात्र,त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते.क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, असं तंझीम साकिब म्हणाला. साकिबच्या मते राजकीय कारणांमुळे मुस्तफिजुर रहमानला वगळण्यात आले.
तंझीम साकिब म्हणाला, "मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून का वगळण्यात आले हे स्पष्ट नाही. कदाचित यामागे राजकीय कारणे असू शकतात. परंतु राजकारण क्रिकेटपासून दूर राहिलेले चांगले आहे. खेळाडू म्हणून आम्ही राजकीय पैलूंबद्दल विचार करत नाही. आम्हाला आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा आहे आणि आम्ही त्यानुसार आमचे नाव पाठवतो. पुढील वर्षी, आम्ही आमचे नाव पाठवायचे की नाही हे ठरवण्यापूर्वी देशातील एजंट आणि संबंधित लोकांशी सल्लामसलत करू."
