Ind vs Pak : भारताविरुद्धच्या बॉयकॉटवर PCB–ICC मध्ये चर्चा, पाकिस्तानची नवी खेळी; बांगलादेश बोर्डसोबत गुप्त बैठक?
IND vs PAK T20 World Cup : भारताविरुद्धचा सामना खेळण्यास नकार देण्याच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावरून सध्या पीसीबी आणि आयसीसी यांच्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

IND vs PAK T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताविरुद्धचा सामना खेळण्यास नकार देण्याच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) निर्णयावरून सध्या पीसीबी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (ICC) यांच्यात जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पीसीबीने आयसीसीला अधिकृत पत्र पाठवून ‘फोर्स मेज्योर’ (Force Majeure) क्लॉज लागू करण्याचा इरादा व्यक्त केला होता. दरम्यान, शनिवारी आयसीसीने पाकिस्तानकडे स्पष्टिकरण मागितले आहे की, संघाच्या सामना न खेळण्याच्या निर्णयासाठी ‘फोर्स मेज्योर’ क्लॉज नेमका कसा लागू होतो. या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानने नवा डाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
या सगळ्यामध्ये, पाकिस्तान आता गटबाजीत अडकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पीसीबी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांच्यात एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीबाबत अद्याप ना आयसीसीने, ना पीसीबीने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
अहवालांनुसार, वाढत्या तणावावर तोडगा काढण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम हे लाहोरमध्ये पीसीबीसोबत चर्चेसाठी दाखल झाले आहेत. हा वाद तेव्हा उफाळून आला, जेव्हा बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या पाठिंब्याने बीसीबीने सुरक्षा कारणांचा हवाला देत ग्रुप स्टेजमधील सामने खेळण्यासाठी आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर बांगलादेशने अधिकृतपणे आयसीसीकडे विनंती केली की, त्यांचे सामने सह-यजमान श्रीलंका येथे हलवण्यात यावेत.
पाकिस्तानवर बंदीची टांगती तलवार?
खरं तर भारत-पाकिस्तान सामना हा क्रिकेटमधील सर्वात मोठा ‘रेव्हेन्यू जनरेटिंग’ सामना मानला जातो. जर पाकिस्तान या सामन्यातून माघार घेत असेल, तर आयसीसीला सुमारे 2200 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बोर्डांमध्ये बॅकचॅनल चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आयसीसीने पीसीबीला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जर पाकिस्तानने सामना खेळण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाची पाकिस्तानला विनंती
या प्रकरणात आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) नेही हस्तक्षेप करत PCB ला पत्र लिहिले आहे. या पत्रात श्रीलंकेने पाकिस्तानला बॉयकॉटचा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा, अशी विनंती केली आहे, कारण यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते. शिवाय, 2009 मधील लाहोर दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या पहिल्या मोठ्या क्रिकेट राष्ट्रांपैकी श्रीलंका एक असल्याची आठवणही SLC ने करून दिली आहे.
माजी ICC प्रमुखांचे मत काय?
या संपूर्ण वादावर माजी ICC प्रमुख आणि माजी PCB अध्यक्ष एहसान मणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, हा प्रश्न सोडवण्यासाठी सध्याचे ICC अध्यक्ष जय शाह आणि PCB प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यात थेट संवाद होणे गरजेचे आहे.
हे ही वाचा -





















