Bangladesh Announce 2026 T20 World Cup Squad : मुस्तफिजूर रहमानवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कप 2026साठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. 15 खेळाडूंच्या या संघाची धुरा लिटन दासकडे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील बांग्लादेशचा मोहीम पहिल्याच दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारत–बांगलादेश क्रिकेट संबंधांमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या मुस्तफिजूर रहमानलाही या संघात स्थान देण्यात आले आहे.

Continues below advertisement

आधी भारतात खेळण्यास नकार, आता थेट टी-20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा

मुस्तफिजूर रहमानला आयपीएल 2026 मधून बाहेर काढल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून, त्याच पार्श्वभूमीवर आयसीसी स्पर्धेसाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुस्तफिजूरला डावलण्यात आल्यामुळे बांगलादेशचे क्रीडा मंत्रालय संतप्त असून, हा प्रकार बांगलादेश क्रिकेट आणि खेळाडूचा अपमान असल्याचे त्यांचे मत आहे. क्रीडा मंत्रालयाच्या सूचनेनुसारच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) BCCI कडे ई-मेलद्वारे याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

Continues below advertisement

इतकेच नव्हे, तर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीलाही ई-मेल पाठवून टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील आपल्या सामन्यांचे वेन्यू बदलण्याची मागणी केली आहे. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत, भारताऐवजी श्रीलंकेत सामने खेळवावेत, अशी बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मागणी आहे. उल्लेखनीय म्हणजे, टी-20 वर्ल्ड कप 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहेत.

यंदा सुवर्णसंधी?

बांगलादेशने आतापर्यंत प्रत्येक टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र, आजवर त्यांना कधीही उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. यंदा स्पर्धा भारतीय उपखंडात होत असल्याने, बांगलादेशसाठी ही कामगिरी सुधारण्याची मोठी संधी मानली जात आहे.

बांगलादेशच्या सामन्यांचे निश्चित वेळापत्रक

निश्चित वेळापत्रकानुसार, बांग्लादेश 7 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. त्यानंतर 9 फेब्रुवारीला इटलीशी, तर 14 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध महत्त्वाचा सामना होणार आहे. हे तिन्ही सामने कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवले जाणार आहेत. याशिवाय, गट टप्प्यातील अखेरचा सामना बांगलादेशला नेपाळविरुद्ध मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळावा लागणार आहे.

2026 च्या T20 विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ (Bangladesh squad for T20 World Cup 2026) -

लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसेन, सैफ हसन, तौहीद हृदोय, शमीम हुसेन, नुरुल हसन, मेहदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद, शैफुद्दीन, शरीफुल इस्लाम. 

हे ही वाचा -

BCCI VS BCB : बांगलादेशचा संपूर्ण प्लॅन उध्वस्त, टी-20 वर्ल्डकपच्या तोंडावर BCCIने मॅच शिफ्टिंगची मागणी धुडकावून लावली, नेमकं काय घडलं?