Babar Azam Ruled OUT Eng vs Pak 1st Test : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम हेडिंग्ले येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुखापतीमुळे बाबर अद्याप पूर्णपणे फिट झालेला नसल्याने त्याला पहिल्या सामन्यातून विश्रांती घ्यावी लागणार आहे. बाबरच्या अनुपस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सलमान अली आगा याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. बाबर आझमसाठी तसेच पाकिस्तानच्या संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील दोन कसोटी सामन्यांमध्ये बाबरने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र दुखापतीमुळे आता तो पहिल्या कसोटीत मैदानावर दिसणार नाही.

Continues below advertisement

सलमान अली आगा पहिल्यांदाच कसोटीत कर्णधार (Salman Agha to lead Eng vs Pak 1st Test)

बाबरच्या अनुपस्थितीत सलमान अली आगा पाकिस्तानच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे. सलमानने यापूर्वी पाकिस्तानच्या टी-20 संघाचे कर्णधारपद भूषवले आहे, मात्र कसोटी क्रिकेटमध्ये तो पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने या मालिकेसाठी अधिकृत उपकर्णधाराची नियुक्ती केलेली नव्हती. त्यामुळे बाबर उपलब्ध नसल्यास पहिल्या कसोटीत पाकिस्तानचे नेतृत्व कोण करणार, याबाबत काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. अखेर पीसीबीने सलमान अली आगा याच्या नावावर शिक्कामोर्तब करून हा सस्पेन्स संपवला.

Continues below advertisement

शान मसूदकडे पुन्हा नेतृत्व नाही

सलमानची कर्णधार म्हणून निवड होताना शान मसूदचे नाव चर्चेत होते. मात्र पीसीबीने त्याच्याकडे पुन्हा संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतलेला नाही. बाबरला कर्णधारपद देण्यापूर्वी शान मसूद पाकिस्तानच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत होता. आता बाबर पहिल्या कसोटीतून बाहेर असल्याने पाकिस्तानने वेगळा पर्याय निवडला असून सलमान अली आगा नव्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रशिक्षकांनी केली बाबरच्या अनुपस्थितीची पुष्टी

पाकिस्तानच्या कसोटी संघाच्या व्यवस्थापनाने बाबरच्या दुखापतीबाबत माहिती देताना त्याच्या पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. बाबरच्या बोटाला दुखापत झाली असून त्यामध्ये सूज असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र बाबरची दुखापत गंभीर नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याची बोट फ्रॅक्चर झालेली नाही. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होण्याची पाकिस्तानला आशा आहे.

बाबरच्या जागी सौद शकीलला संधी?

बाबर आझम पहिल्या कसोटीतून बाहेर झाल्याने त्याच्या जागी कोणाला अंतिम अकरामध्ये संधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुभवी फलंदाज सौद शकील हा त्यासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे. सौद शकीलने पाकिस्तानकडून आतापर्यंत 23 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 43.95 च्या सरासरीने 1,802 धावा आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 4 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे बाबरच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत सौद शकील महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

हे ही वाचा -

 IND vs SL 1st Test DAY-5 Live : गॉलमध्ये आज फैसला!  84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज