Basit Ali on Babar Azam : एक-दीड वर्षांपूर्वीपर्यंत बाबर आझम (Babar Azam) हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार, संघातील सर्वात मोठा स्टार आणि प्रमुख फलंदाज मानला जात होता. मात्र सध्या त्याची ती प्रतिष्ठा ढासळताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेषतः आयसीसी स्पर्धांमध्ये, पाकिस्तान संघासह बाबरच्या सातत्याने होणाऱ्या अपयशामुळे तो तज्ज्ञ आणि चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेवर आधीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात होते, पण आता एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने तर सर्व मर्यादा ओलांडत बाबरला मानसिकदृष्ट्या अनफिट असल्याचे म्हटले आहे.
‘दुखापत नाही, मानसिकदृष्ट्या अनफिट’
बाबर आझम हा आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर त्याला संघातून वगळण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर पाकिस्तानच्या बांगलादेश दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. ही मालिका वनडे स्वरूपाची असली तरी त्या फॉरमॅटमध्ये बाबरची कामगिरी तुलनेने चांगली राहिली आहे. त्यामुळे त्याला बाहेर का ठेवले, यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले.
याबाबत पाकिस्तानचे निवड समिती सदस्य आकिब जावेद (Aaqib Javed) यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, श्रीलंकेतून परतल्यानंतर बाबरला दुखापत झाल्याचे समोर आले, त्यामुळे त्याला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली.
मात्र माजी पाकिस्तानी फलंदाज बासित अली (Basit Ali) यांना हे कारण मान्य नाही. वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या बासित अली यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले, “बाबर आझम शारीरिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्या अनफिट आहे.” ते इथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढे असेही म्हटले की, बांगलादेश दौऱ्यासाठी बाबरची निवड न होणे योग्यच होते, कारण तो त्या मालिकेतही अपयशी ठरला असता.
सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेत अपयश बाबर आझम आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सगळीकडून फेल ठरला. या स्पर्धेत त्याने 6 डाव खेळले आणि केवळ 91 धावा केल्या. त्यातील त्याचा सर्वोच्च स्कोर फक्त 46 धावा इतकाच होता. विशेष म्हणजे आयसीसी स्पर्धांमध्ये बाबर अपयशी ठरण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 आणि आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 या स्पर्धांमध्येही त्याची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. या सर्व स्पर्धांमध्ये पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती.
हे ही वाचा -
