Australia vs Bangladesh 1st Test : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ म्हटलं की जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक अशी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला आहे. मात्र, बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची हीच ताकद कमकुवत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी आणि गोलंदाजीत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर आता क्षेत्ररक्षणातही अक्षरशः नाक कापलं आहे.
बांगलादेशने पहिल्या डावात 400 हून अधिक धावा करत ऑस्ट्रेलियावर मोठी आघाडी मिळवली. या कामगिरीत बांगलादेशच्या फलंदाजांचा वाटा मोठा असला, तरी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी महत्त्वाच्या क्षणी सोडलेले झेलही त्यांच्या अडचणी वाढवणारे ठरले. विशेष म्हणजे एका षटकात ऑस्ट्रेलियाने दोन झेल सोडल्याने संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
एकाच षटकात 2 झेल सोडले...
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला बांगलादेशचा डाव लवकर संपवण्याची संधी होती. मात्र, बांगलादेशचा मेहदी हसन मिराज संघासाठी भक्कमपणे उभा राहिला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी दोन महत्त्वाचे झेल सोडले. पॅट कमिन्स बांगलादेशच्या डावातील 129वं षटक टाकत होता. या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर तस्किन अहमदने चेंडू हवेत मारला. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. तिथे उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथकडे झेल घेण्याची सोपी संधी होती. मात्र, स्मिथच्या हातातून चेंडू निसटला आणि तस्किनला जीवदान मिळालं.
याच षटकातील पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने आणखी एक झेल सोडला. कमिन्सने पुन्हा शॉर्ट बॉल टाकला आणि मेहदी हसन मिराजने त्यावर पुल शॉट खेळला. चेंडू हवेत उंच गेल्यानंतर ट्रेविस हेडने मागे धावत झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला हा झेल पकडता आला नाही. एकाच षटकात दोन झेल सुटल्याने ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षणावर टीका होऊ लागली. दोन जीवदान मिळाल्यानंतर मेहदी हसन मिराजने त्याचा पुरेपूर फायदा उठवला. मात्र, 134व्या षटकात ऑस्ट्रेलियाला अखेर यश मिळालं. जोश हेजलवूडने मिराजला यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हाती झेलबाद करत त्याची खेळी संपवली. मिराजने 154 चेंडूंचा सामना करत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 65 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
फलंदाजीतही ऑस्ट्रेलियाचा फज्जा
क्षेत्ररक्षणातील चुका हा ऑस्ट्रेलियाच्या अडचणींचा एकमेव भाग नाही. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजीही सपशेल अपयशी ठरली. बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 198 धावांवर आटोपला. यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तंजिद हसनने ऐतिहासिक शतक झळकावत बांगलादेशच्या डावाला भक्कम सुरुवात करून दिली. त्याला कर्णधार नजमुल हुसैन शांतोने 85 धावांची शानदार साथ दिली. त्यानंतर मेहदी हसन मिराजच्या अर्धशतकी खेळीने बांगलादेशची धावसंख्या 400 पार पोहोचली.
बांगलादेशची 228 धावांची आघाडी
बांगलादेशने पहिल्या डावात 426 धावा केल्या. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियावर तब्बल 228 धावांची मोठी आघाडी मिळाली. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध बांगलादेशने फलंदाजी, गोलंदाजी आणि मानसिक दबाव या तिन्ही बाबतीत वर्चस्व गाजवलं. ऑस्ट्रेलियासाठी परिस्थिती आणखी चिंताजनक म्हणजे संघाने फलंदाजीत धावा केल्या नाहीत, गोलंदाजांना बांगलादेशच्या फलंदाजांवर अपेक्षित दबाव निर्माण करता आला नाही आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणातही महत्त्वाचे झेल सोडले.
हे ही वाचा -
LIVE सामन्यात गर्लफ्रेंडला मेसेज केला अन् भलतंच घडलं! BCCIने ठोकला लाखांचा दंड, नेमकं काय घडलं?
