Auqib Nabi Included In Test Squad : जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याच्या सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीला अखेर न्याय मिळाला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याची भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या बॅकअप म्हणून त्याला संधी देण्यात आली आहे. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर जम्मू-काश्मीरला इतिहासातील पहिले रणजी करंडक विजेतेपद मिळवून देणाऱ्या आकिबसाठी हा क्षण अत्यंत खास आणि ऐतिहासिक आहे.

दिग्गजांनी निवड समितीवर उपस्थित केले होते प्रश्न

याआधी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यासाठी आकिब नबीची निवड न झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी निवड समितीने पंजाबच्या गुरनूर ब्रारला संधी दिली होती. या निर्णयावर माजी दिग्गज क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि इरफान पठाण यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका हंगामात 60 बळी आणि गेल्या दोन वर्षांत 100 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला डावलणे योग्य नसल्याचे त्यांचे मत होते. विशेषतः बुमराह आणि मोहम्मद सिराजनंतर दर्जेदार वेगवान गोलंदाजांचा पर्याय भारतीय संघाकडे कमी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते.

श्रीलंकेतील परिस्थितीचा मोठा अनुभव

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर निवड समितीसमोर आकिब नबीला संधी देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. त्याच्या निवडीमागे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे अलीकडेच त्याने इंडिया अ संघासोबत श्रीलंका दौरा केला होता. गॉलच्या मैदानावर होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी त्याने तेथे दोन प्रथम श्रेणी सामने खेळून 6 विकेट्स घेतल्या आहेत. गुरनूर ब्रारने त्या दौऱ्यात एका सामन्यात 10 विकेट्स घेतल्या असल्या, तरी गॉलच्या खेळपट्टीचा अनुभव आणि स्थानिक परिस्थितीची चांगली जाण हा आकिबच्या निवडीतील महत्त्वाचा घटक ठरला.

प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे सोपे नाही

भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले असले तरी आकिब नबीचे पदार्पण निश्चित मानले जात नाही. श्रीलंकेतील फिरकीला पोषक खेळपट्ट्या लक्षात घेता भारत तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे पहिल्या पसंतीचे वेगवान गोलंदाज आहेत, तर गुरनूर ब्रारही शर्यतीत आहे. त्यामुळे अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यासाठी आकिबला अजूनही मोठी प्रतीक्षा करावी लागू शकते.

स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी

आकिब नबीला जर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली, तर त्याला ती दोन्ही हातांनी स्वीकारावी लागेल. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना सपाट खेळपट्ट्यांवर त्याने भरपूर धावा दिल्या आणि त्याच्या मध्यम गतीच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची त्याची क्षमता हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे संधी मिळाल्यास आपल्या गुणवत्तेच्या जोरावर भारतीय संघात कायमस्वरूपी स्थान मिळवण्याची हीच त्याच्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

हे ही वाचा -

Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी