Asia Cup Trophy Mohsin Naqvi Ind vs Pak: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) भारताने पाकिस्तानचा पराभव करत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. मात्र आशिया चषकात जेतेपद पटकावूनही अद्याप भारतीय संघाला ट्रॉफी मिळालेली नाहीय. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीच्या (Mohsin Naqvi) हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन मैदानाच्या बाहेर निघून गेले. याचदरम्यान, काल (30 सप्टेंबर) आशियाई क्रिकेट कौन्सिलची दुबईत बैठक झाली. या बैठकीसाठी बीसीसीआयकडून राजीव शुक्ला (Rajeev Shukla) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी राजीव शुक्ला यांच्यासह आशिष शेलार यांनी मोहसीन नक्वीला चांगलाच जाब विचारला. त्यामुळे आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीतही जोरदार राडा झाला.
आशिष शेलारांनी मोहसीन नक्वीला घेरले- (Ashish Shelar In ACC Meeting)
मोहसीन नक्वीने आपल्या अध्यक्षीय भाषणात आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचं अभिनंदन करण्याचं टाळलं. त्यावरही आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला आणि मोहसीन नक्वीला त्याबद्दल जाबही विचारला. त्यानंतरच नक्वीने भारतीय संघाचं आशिया चषक विजयाबद्दल अभिनंदन केलं, अशी माहिती एसीसीतल्या सूत्रांनी दिली आहे. तसेच आशिया चषकाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात झालेल्या गोंधळाप्रकरणी आणि विजेतेपदाची ट्रॉफी भारतीय संघाला सन्मानानं मिळण्याबाबत योग्य उत्तर आणि आश्वासन न मिळाल्यानं बीसीसीआयचे प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीतून सभात्याग केला.
बैठकीत राजीव शुक्ला यांनी मोहसीन नक्वीला सुनावले- (Rajeev Shukla On Mohsin Naqvi)
राजीव शुक्ला- ही ट्रॉफी आमची आहे, तुम्ही ती कशी ठेवू शकता? आणि ती आशियाई क्रिकेट परिषदेला का सादर केली जात नाही?
मोहसीन नक्वी- मला अनधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले की, जर भारत जिंकला तर संघ माझ्याकडून ट्रॉफी घेईल. जर मला माहित असते की असे होणार नाही, तर मी येथे आलो नसतो.
राजीव शुक्ला- तुमचे कोणते अनधिकृत सूत्र? तुम्ही आम्हाला विचारायला हवे होते. सुरुवातीपासूनच आमची भूमिका स्पष्ट आहे. भारतीय संघ तुमच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही.
मोहसीन नक्वी- मी याबद्दल तुमच्याशी स्वतंत्रपणे बोलेन जेणेकरून आम्हाला तोडगा काढता येईल.